एपीपीएस डेली सोल्युशन कंपनीला ग्राहक मंचचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 01:02 AM2020-07-15T01:02:29+5:302020-07-15T01:08:17+5:30
तक्रारकर्त्या ग्राहकाचे २३ हजार १७० रुपये १२ टक्के व्याजासह परत करावे असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एपीपीएस डेली सोल्युशन कंपनीला दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तक्रारकर्त्या ग्राहकाचे २३ हजार १७० रुपये १२ टक्के व्याजासह परत करावे असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एपीपीएस डेली सोल्युशन कंपनीला दिला आहे. व्याज २६ मे २०१६ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ५ हजार व तक्रारीच्या खर्चापोटी ३ हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली. सदर रक्कमही कंपनीनेच द्यायची आहे.
दीपेश उत्तमनी असे ग्राहकाचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीवर मंचच्या पीठासीन सदस्या स्मिता चांदेकर व सदस्य अविनाश प्रभुणे यांनी हा निर्णय दिला. निर्णयावर अंमलबजावणी करण्यासाठी कंपनीला एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. तक्रारीतील माहितीनुसार, उत्तमनी यांनी २२ आॅगस्ट २०१५ रोजी न्यू शरण मोबाईल गॅलरीमधून ५५ हजार रुपयाचा मोबाईल खरेदी केला होता. तसेच, एपीपीएस डेली सोल्युशन कंपनीकडून मोबाईलचा विमा काढला होता. त्याकरिता कंपनीकडे २००० रुपये प्रीमियम जमा केले होते. १५ एप्रिल २०१६ रोजी तो मोबाईल खाली पडला. त्यामुळे मोबाईलचे नुकसान झाले. उत्तमनी यांनी सर्व्हिस सेंटरला लगेच घटनेची माहिती दिली. तसेच, मोबाईल हॅण्डसेट बदलवून मिळण्याकरिता एपीपीएस डेली सोल्युशन कंपनीकडे दावा दाखल केला. त्यानंतर कंपनीच्या सूचनेनुसार नवीन हॅण्डसेटच्या वाढीव किमतीचे २३ हजार १७० रुपये जमा केले. कंपनीने ही रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर कंपनीने उत्तमनी यांच्या दाव्यावर निर्णय घेतला नाही व संबंधित रक्कमही परत केली नाही. त्यामुळे उत्तमनी यांनी कंपनीला कायदेशीर नोटीस बजावली. कंपनीने त्यालाही उत्तर दिले नाही. परिणामी, उत्तमनी यांनी ग्राहक मंचमध्ये तक्रार दाखल केली होती. मंचने ती तक्रार अंशत: मंजूर केली.