अप्पू वाधवानीची सहा तास चौकशी
By admin | Published: May 12, 2017 02:52 AM2017-05-12T02:52:48+5:302017-05-12T02:52:48+5:30
कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी याचा भागीदार म्हणून चर्चेत आलेला वेदप्रकाश ऊर्फ अप्पू वाधवानी याची तब्बल सहा तास चौकशी केल्यानंतर
भूमाफिया ग्वालबन्सीचा भागीदार : अटक न झाल्यामुळे चर्चेला उधाण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी याचा भागीदार म्हणून चर्चेत आलेला वेदप्रकाश ऊर्फ अप्पू वाधवानी याची तब्बल सहा तास चौकशी केल्यानंतर गुन्हेशाखेतून मुक्तता करण्यात आल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, ग्वालबन्सी प्रकरणात कुख्यात दिलीप, नगरसेवक जगदीश ग्वालबन्सी, नगरसेवक हरीश ग्वालबन्सी आणि त्याच्या गुंडांसोबतच अप्पू वाधवानीचेही नाव अनेक गुन्ह्याशी जुळले असल्याच्या आरोपामुळे अप्पूच्या सदरमधील हिरालक्ष्मी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कार्यालयासह तीन ठिकाणी विशेष तपास पथकांनी मंगळवारी धाडी घातल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी अप्पूच्या कार्यालयातून शेकडो कोटींच्या गैरव्यवहारांचा संशय आल्याने ५० पेक्षा जास्त फाईल्स जप्त केल्या होत्या.
कुख्यात अप्पू वाधवानी भूमाफिया ग्वालबन्सीचा भागीदार म्हणून सर्वत्र कुपरिचित आहे. ग्वालबन्सीप्रमाणेच शहरातील अनेक जमिनी हडप करण्यात त्याचीही भूमिका असल्याची जोरदार चर्चा होती.
दिलीप ग्वालबन्सीला अटक झाल्यापासून अप्पू कमालीचा सक्रिय झाला होता. त्याने विविध राजकीय नेत्यांच्या माध्यमातून हे प्रकरण दडपण्याचेही प्रयत्न केले. त्यानंतर अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्याने या प्रकरणात समेट घडविण्यासाठी धावपळ केली. अनेकांना लाखोंचेआमिष दाखवून कारवाईचे बालंट टाळण्याचाही प्रयत्न केला होता.
पोलीस दबावात आले ?
अप्पू वाधवानी गुन्हे शाखेत पोहचण्यापूर्वीच पोलिसांवर त्याने दबाव वाढवला. आपल्याला अटक केली जाणार नाही, याचीही त्याने पध्दतशीर व्यवस्था केली होती. त्याचमुळे पोलीस दबावात आले आणि त्याला चौकशीच्या नावाखाली सहा तास गुन्हे शाखेत ठेवल्यानंतर रात्री मोकळे केल्याची जोरदार चर्चा आहे. संबंधित सूत्रांच्या मते अप्पू वाधवानी याच्या विरोधात ज्याने तक्रार केली होती, त्या व्यक्तीसोबत काहींनी समेट घडविण्यासाठी दोन दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले होते. काहींनी एका तक्रारकर्त्याला धमकावले होते तर काहींनी दोन कोटी रुपयांच्या बदल्यात एका पीडिताचे तोंड बंद केल्याचीही जोरदार चर्चा आहे. त्यामुळे आता हे गंभीर प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.