नागपुरात कल चाचणीची विनाकारण ‘कलकल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 10:57 PM2018-12-14T22:57:59+5:302018-12-14T22:58:54+5:30
गेल्या तीन वर्षांपासून दहावीनंतर विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाने कल चाचणीचा प्रयोग राबविला आहे. पहिल्याच वर्षी कलचाचणीच्या प्रमाणपत्रावर शिक्षणमंत्र्यांचा फोटो छापल्याने कलचाचणी वादात आली होती. यावर्षी कलचाचणी शिक्षण विभागाने न घेता, एका संस्थेला काम दिले आहे. दुसरीकडे शाळेत विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यावर बंधन असल्याने, कलचाचणी मात्र मोबाईलवर घेण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षात शिक्षकांच्या अनुभवातून कलचाचणीचा कुठलाही उपयोग विद्यार्थ्यांना होत नसतानाही शिक्षण विभागाकडून कलचाचणी रेटून धरत त्यात उगाच नवनवीन प्रयोग करून शिक्षकांची डोकेदुखी वाढवित आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या तीन वर्षांपासून दहावीनंतर विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाने कल चाचणीचा प्रयोग राबविला आहे. पहिल्याच वर्षी कलचाचणीच्या प्रमाणपत्रावर शिक्षणमंत्र्यांचा फोटो छापल्याने कलचाचणी वादात आली होती. यावर्षी कलचाचणी शिक्षण विभागाने न घेता, एका संस्थेला काम दिले आहे. दुसरीकडे शाळेत विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यावर बंधन असल्याने, कलचाचणी मात्र मोबाईलवर घेण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षात शिक्षकांच्या अनुभवातून कलचाचणीचा कुठलाही उपयोग विद्यार्थ्यांना होत नसतानाही शिक्षण विभागाकडून कलचाचणी रेटून धरत त्यात उगाच नवनवीन प्रयोग करून शिक्षकांची डोकेदुखी वाढवित आहे.
दहावीनंतर विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी १८ डिसेंबर ते १७ जानेवारी दरम्यान कल चाचणी घेण्यात येत आहे. यावर्षी कल चाचणीची जबाबदारी शामची आई फाऊंडेशन या संस्थेला दिली आहे. ही संस्था मोबाईल अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची कलचाचणी घेणार आहे. खासगी संस्थेला कलचाचणीने दिलेल्या अधिकारावर शिक्षकांनी आक्षेप घेतला आहे. आतापर्यंत झालेल्या तीन कलचाचण्या शिक्षण मंडळाने घेतल्या होत्या. शासनाचा शिक्षण मंडळावर विश्वास राहिला नाही का, असा सवाल शिक्षकांनी केला आहे. कलचाचणीसाठी मोबाईलच्या वापरावरसुद्धा शिक्षकांनी आक्षेप घेतला आहे. चाचणीसाठी मोबाईल कोण उपलब्ध करून देईल? यासाठी शिक्षकांनी आपला मोबाईल का वापरावा? विद्यार्थ्यांना घरचा मोबाईल आणण्यासाठी सांगितले तर त्याचे काय परिणाम होतील? मोबाईल वापराचे दुष्परिणाम समोर येत आहेत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास निर्बंध आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर टाळावा, असा आग्रह आणि विचार सगळीकडे सुरू असताना मोबाईलवर कलचाचणी घेतली जात आहे, असे विविध प्रश्न शिक्षण क्षेत्रातून विचारल्या जात आहे.
आधी शिक्षण मंडळाकडून चाचणीसाठी सिडी दिली जात होती. त्याचा कालावधी ४० मिनिट होता. आता कलचाचणी सोबतच अभिक्षमता चाचणी देणे आहे. कालावधी १ तास ३० मिनिटांचा आहे. डिसेंबर महिना हा विद्यार्थ्यांना व शाळांसाठी फार महत्त्वाचा असतो. अभ्यासक्रम पूर्ण करणे, सराव परीक्षांचे नियोजन करणे, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षांचे नियोजन करणे व त्याद्वारे विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी तयार करण्याची कसरत शिक्षकांना करावी लागते. याकाळात कलचाचणीचे आयोजन करणे विद्यार्थी व शिक्षकांच्या हिताचे नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
कल चाचणीचा आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेता, विद्यार्थ्यांसाठी त्याची उपयुक्तता सिद्ध झाली नाही. ज्या गोष्टीची उपयुक्तता विशेष नाही शासन त्यावर जास्त भर देत आहे. परीक्षेचे दिवस जवळ असताना, अशा परीक्षा घेऊन शासन विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचीही डोकेदुखी वाढवित आहे.
पुरुषोत्तम पंचभाई, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघटना