अपूर्वमंगलरत्न सागरसुरिश्वरजी म.सा. पंचत्वात विलीन
By admin | Published: May 30, 2017 01:52 AM2017-05-30T01:52:08+5:302017-05-30T01:52:08+5:30
तपस्वी रत्न पू. आचार्य नवरत्नसागरसुरीजी महाराज यांचे परमशिष्य परम तपस्वी पु. आ.भ. अपूर्वमंगलरत्न सागरसुरिश्वरजी म.सा. सोमवारी सायंकाळी पंचत्वात विलीन झाले.
अंतिम दर्शनासाठी श्रद्धाळूंची गर्दी : कापसीत झाले अंत्यसंस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तपस्वी रत्न पू. आचार्य नवरत्नसागरसुरीजी महाराज यांचे परमशिष्य परम तपस्वी पु. आ.भ. अपूर्वमंगलरत्न सागरसुरिश्वरजी म.सा. सोमवारी सायंकाळी पंचत्वात विलीन झाले. संजयभाई नटवरलाल मेहता यांच्या कापसी येथील शेतामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी संभवनाथ जैन मंदिर, वर्धमाननगर येथे सकाळी ९ वाजतापासून पार्थिव ठेवण्यात आले होते. दुपारी ४ नंतर पालखी कापसी गावाकडे मार्गस्थ झाली. यात देशातील विविध भागातून मोठ्या संख्येने श्रद्धाळू सहभागी झाले होते. पु.आ.भ. अपूर्वमंगलरत्न सागरसुरिश्वरजी म.सा. यांचा रविवारी रात्री ९.५० वाजता कालधर्म झाला होता. मंगळवारी ३० मे रोजी संभवनाथ जैन मंदिर, वर्धमाननगर येथील सभागृहात सकाळी ९ ते ११ दरम्यान गुणानुवाद आयोजित करण्यात आला आहे.
श्रद्धासुमन केले अर्पित
श्रमण वृंद मुनिश्री प्रशमरती विजयजी म.सा., मुनिश्री आगमरत्न सागरजी म.सा., मुनिश्री प्रशमरत्न सागरजी म.सा. व मुनिश्री वज्ररत्न सागरजी म.सा. यांच्यासोबत श्रमणीवृंद सा. सुरेखा श्रीजी, चारित्र रसा श्रीजी, विराग रसा श्रीजी, नवपूर्व रसा श्रीजी, प्रियम रसा श्रीजी, श्रियम रसा श्रीजी यांनी श्रद्धासुमन अर्पित केले. मुंबईचे विनीत गेमावत व इंदूरचे अरविंद चोरडिया यांनी स्वरांजली अर्पित करीत भजन सादर केले. संचालन संभवनाथ जैन मंदिरचे अध्यक्ष गणेशभाई जैन यांनी केले.
संक्षिप्त जीवन परिचय
अपूर्वमंगलरत्न सागरसुरिश्वरजी म.सा. यांचे नाव अशोक होते. त्यांचा जन्म देपालपूर, मध्य प्रदेश येथे २ मे १९५४ मध्ये झाला होता. त्यांचे वडील केशरीमलजी व आई सदुबाई होती. ते पाच भाऊ होते. यात सागरमल, समर्थमल, मणी, सुभाष व बहीण प्रभाबेन व पुष्पाबेन यांचा समावेश आहे. त्यांनी वयाच्या २२ व्या वर्षी दीक्षा घेतली होती. सलग ४२ वर्षे त्यांनी तपस्या केली. वैशाख सुद एकादशीला (भक्तामर तीर्थ) आचार्य पदवी घेतली. त्यांनी वर्धमान तप, वर्षीतपसारख्या अनेक तपस्या केल्या. देशातील अनेक राज्यांत त्यांनी भ्रमण केले. त्यांच्या कुटुंबात वडील व भाऊ यांच्यासह १० जणांनी दीक्षा घेतली आहे. त्यांच्या शिष्य परिवारात अमर, आगम, प्रशम, वज्र, रत्न सागरजी म.सा. यांचा समावेश आहे.