आर्वीतील महिलेची नागपुरात आत्महत्या : मित्राकडून अपेक्षाभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 08:06 PM2019-04-13T20:06:40+5:302019-04-13T20:08:14+5:30
आर्वी (जि. वर्धा) येथील एका महिलेने मित्र-प्रेमात अपेक्षाभंग झाल्याने विष प्र्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी महाराजबागजवळ घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आर्वी (जि. वर्धा) येथील एका महिलेने मित्र-प्रेमात अपेक्षाभंग झाल्याने विष प्र्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी महाराजबागजवळ घडली. आरती भगत (वय २६) असे मृत महिलेचे नाव आहे.
आरती मूळची आर्वी येथील रहिवासी होती. गेल्या काही दिवसांपासून ती लता मंगेशकर हॉस्पिटल मार्गावरील आंबेडकर वॉर्डात राहत होती. तिला दोन मुले आहेत. पहिल्या पतीसोबत पटत नसल्याने तिने दुसऱ्या एका तरुणासोबत संबंध जोडले होते. या तरुणाकडे तिने लग्नासाठी तगादा लावला होता. तो टाळत असल्याने ती संतप्त झाली होती. तिने शुक्रवारी सकाळी ११.३० च्या सुमारास तिच्या मित्राला महाराजबागजवळ भेटायला बोलविले. तिने पुन्हा त्याच्याजवळ लग्नाचा विषय काढला. त्याने लग्नास नकार दिल्याने तिने आत्महत्येची धमकी दिली. मित्राने ती गंमत करत असावी असे समजून तिच्याकडे दुर्लक्ष केले. तो दुर्लक्ष करीत असल्याचे जाणवल्याने निराश झालेल्या आरतीने सोबत आणलेले कीटकनाशक प्राशन केले. तिच्या तोंडातून फेस येत असल्याचे पाहून मित्राने तिला लगेच मेडिकलमध्ये दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे २.३० च्या सुमारास डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, मेडिकलमधील पोलीस केंद्रातून सूचना मिळाल्याने सीताबर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.