दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांची मनमानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:07 AM2021-04-10T04:07:48+5:302021-04-10T04:07:48+5:30
सुदाम राखडे लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : शहरातील तालुका दुय्यम निबंधक कार्यालयात काही अर्जनवीस आणि दलालांचे प्रस्थ चांगलेच वाढले ...
सुदाम राखडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : शहरातील तालुका दुय्यम निबंधक कार्यालयात काही अर्जनवीस आणि दलालांचे प्रस्थ चांगलेच वाढले आहे. या मंडळींनी दस्तऐवजदारांकडून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या पैसे उकळून रजिस्ट्री करण्याचा सपाटा सुरू केला आहे. या प्रकारामुळे प्रामाणिक व्यक्तींना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या प्रकाराला जिल्हाधिकाऱ्यांनी चाैकशी करून आळा घालावा, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.
राज्य शासनाने ग्रामीण भागासाठी ३१ मार्चपर्यंत मुद्रांक व नोंदणी शुल्क तीन टक्के तर नागरी व औद्योगिक क्षेत्रासाठी चार टक्के ठरवून दिला आहे. या कार्यालयात राेज किमान ७० रजिस्ट्री केली जात असल्याने याचा फायदा काही अर्जनवीस व दलालांनी घेतला. त्यांच्याच माध्यमातून रजिस्ट्री करावी लागत असल्याने नागरिकांना त्यांच्याशिवाय पर्याय नाही. नेमकी हीच बाब हेरून अर्जनवीस व दलालांनी नागरिकांकडून तीन ते चार टक्क्यांऐवजी नागरिकांकडून १५ ते २० हजार रुपये अधिक वसूल करायला सुरुवात केली आहे. यासाठी अर्जनवीस व दलाल खाेटी माहिती देऊन नागरिकांची दिशाभूल करतात आणि त्यांच्या अगतिकतेचा फायदा घेतात.
पूर्वी या कार्यालयात महिला निबंधक कार्यरत हाेत्या. त्यांच्या काळात ही समस्या येत नव्हती, असेही अनेक जाणकार व्यक्तींनी सांगितले. विशिष्ट अर्जनवीस आणि दलालांचे प्रस्थ वाढविण्यात आल्याने आर्थिक लूट हाेत असून, त्रास सहन करावा लागत असल्याचे काहींनी सांगितले. या कार्यालयासमाेरीत गर्दीत बहुतांश नागरिक विना मास्क असतात. कुणीही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाही. येथे बसण्याची साेय नसल्याने काही नागरिक व्हरांड्यांतील भिंतीवर बसून असतात तर काही सतत फिरत असतात. ही गर्दी काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता असल्याने तहसीलदार अरविंद हिंगे राेज नागरिकांना सूचना देतात. प्रसंगी बाहेरही काढतात. परंतु, दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नसतात. त्यामुळे या प्रकाराची चाैकशी करणे आवश्यक असल्याचेही काही नागरिकांनी सांगितले.
...
कार्यालयाला जत्रेचे स्वरूप
कामठी तहसील प्रशासकीय इमारतीत पहिल्या माळ्यावर तालुका दुय्यम निबंधक (प्रथम श्रेणी) कार्यालय आहे. या कार्यालयात राेज ८० ते ९० मालमत्तांच्या खरेदी विक्रीची रजिस्ट्री केली जाते. यात शेती, जमीन, संपत्ती, भूखंड, घर आदी स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. रजिस्ट्रीचे प्रमाण अधिक असल्याने या कार्यालयाला राेज जत्रेचे स्वरूप प्राप्त हाेते. या कामासाठी येणारे नागरिक काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांची पायमल्लीही करताना दिसून येते.
...
अर्जनवीसकडे जाण्याचा सल्ला
मार्चमध्ये एका महिलेने याच कार्यालयात २५ लाख रुपयांची रजिस्ट्री लावली हाेती. एका अर्जनवीसने तिच्याकडून १ लाख ३० हजार रुपये अधिक घेतल्याची माहिती त्या महिलेने दिली. या महिलेसोबतच येरखेडा, भिलगाव येथील दस्तऐवजदारांकडून अर्जनवीस व दलालांनी मोठ्या प्रमाणात पैसे घेतले असून, यातील काही वाटा निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे निबंधक कार्यालयात दस्तऐवजदारांकडून संपत्तीची रजिस्ट्री करीत असताना निबंधक त्यांच्याशी काेणताही आर्थिक व्यवहार करीत नाही. त्यांना अर्जनवीसकडे जाण्याचा व त्यांच्या माध्यमातून काम करण्याचा सल्ला दिला जाताे, असेही नागरिकांनी सांगितले.
...
आपण नियम धाब्यावर ठेवून कामे करीत असताे. अर्जनवीस व दलालांमार्फत नागरिकांकडून माेठ्या प्रमाणात अवैध वसुली करताे, हे आराेप पूर्णपणे चुकीचे व खाेटे आहेत. रजिस्ट्री करताना नागरिकांकडून अतिरिक्त रक्कम घेतली जात नाही. दस्तऐवज मुद्रांक व नोंदणी शुल्क शासनाच्या नियमानुसार घेतले जाते.
- एस. टी. कपले,
दुय्यम निबंधक, कामठी.