कचरा संकलन कंपन्यांची मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:08 AM2021-05-27T04:08:06+5:302021-05-27T04:08:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्वच्छतेत नागपूरचा अव्वल क्रमांक यावा, यासाठी शहरातील कचरा संकलन यंत्रणा सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

Arbitrariness of waste collection companies | कचरा संकलन कंपन्यांची मनमानी

कचरा संकलन कंपन्यांची मनमानी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : स्वच्छतेत नागपूरचा अव्वल क्रमांक यावा, यासाठी शहरातील कचरा संकलन यंत्रणा सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला. यातूनच दीड वर्षांपूर्वी दोन कंपन्यांकडे शहरातील कचरा उचलण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. परंतु या कंपन्यांची मनमानी सुरू आहे. कोरोच्या दुसऱ्या लाटेत शहरालगतच्या भागात व बाजारात कचरा संकलनासाठी कर्मचारी दोन-तीन दिवसानंतर जातात. त्यात तोटा वाढल्याचे कारण पुढे करून दोन्ही कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे.

महापालिकेने झोन १ ते ५ मधील कचरा संकलनाची जबाबदारी एजी एन्व्हायरो कंपनीला दिली आहे. तर झोन ६ ते १० मधील कचरा उचलण्याची जबाबदारी बीव्हीजी कंपनीकडे आहे. एजी एन्व्हायरो कंपनीने कोरोनाच्या पहिल्या लाटेत १२३ कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरवून कामावरून कमी केले. तर बीव्हीजी कंपनीने काही महिन्यापूर्वी ११४ कर्मचारी कमी केले. कर्मचारी कमी केल्याचा परिणाम शहरातील कचरा संकलनावर झाला आहे. असे असूनही कर्मचारी कमी करण्याच्या मुद्यावरून मनपा प्रशासनाने हात वर केले आहे.

मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्याकडे कचरा उचलला जात नसल्याच्या दररोज तक्रारी येत आहेत. त्यांनी शहरातील कचरा उचलला जात नसल्याचा मुद्दा सर्वसाधारण सभेत उपस्थित केला आहे. या विषयावर स्थगन प्रस्ताव आणण्याचा त्यांचा विचार आहे. कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या दोन्ही कंपन्यांचे काम समाधानकारक नसल्याची माहिती तानाजी वनवे यांनी लोकमतला दिली. शहरातील अनेक वस्त्यात दररोज कचरा उचलला जात नाही. कंपन्यांचे वाहन दोन-तीन दिवसांनी येते. वास्तविक बाजार भागातील कचरा दिवसातून दोनदा उचलण्याचा निर्णय झाला होता, परंतु याचे पालन होत नाही. महापालिका प्रशासन यात बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

.....

पूर्ण काम करूनही वेतन अर्धेच

कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी दोन्ही कंपन्यांकडून कचऱ्यात माती मिसळण्याचे प्रकार सुरू आहे. कर्मचाऱ्यांकडून महिनाभर काम करून घेतले जाते. परंतु त्यांना १५ ते २० दिवसांचेच वेतन दिले जाते. यासंदर्भात अनेक तक्रारी येत आहेत. कंपन्यांची मनमानी बंद झाली पाहिजे. जो कर्मचारी याला विरोध करतो, त्याला कामावरून कमी केले जाते. यामुळे कर्मचारी दहशतीत असल्याचे तानाजी वनवे यांनी सांगितले.

....

नगरसेवकांच्या तक्रारींची दखल नाही

कचरा संकलनासंदर्भात नागरिक नगरसेवकांकडे तक्रारी करतात. यासंदर्भात कंपनीला सूचना केली तर नगरसेवकांच्या सूचनांची दखल घेतली जात नाही. एजी एन्व्हायरो पदाधिकारी नगरसेवकांच्या तक्रारींची दखल घेत नाही. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. शहरातील कचरा दररोज उचलला गेला पाहिजे. बीव्हीजीमधील अधिकारी बदलले आहे. आधीचे अधिकारी मनमानी करीत होते. कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याच्या तक्रारी असल्याचे वनवे यांनी सांगितले.

Web Title: Arbitrariness of waste collection companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.