९ महिला अधिकाऱ्यांच्या हाती पूर्व व पश्चिम विदर्भाची कमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:06 AM2021-07-18T04:06:59+5:302021-07-18T04:06:59+5:30
आनंद डेकाटे नागपूर : आपल्या गुणवत्तेने प्रशासकीय स्तरावर कर्तृत्त्व गाजविलेल्या नऊ महिला अधिकाऱ्यांच्या हाती विदर्भ विकासाची कमान आली आहे. ...
आनंद डेकाटे
नागपूर : आपल्या गुणवत्तेने प्रशासकीय स्तरावर कर्तृत्त्व गाजविलेल्या नऊ महिला अधिकाऱ्यांच्या हाती विदर्भ विकासाची कमान आली आहे. नागपुरात प्राजक्ता लवंगारे-वर्मा विभागीय आयुक्त, नागपूरच्या जिल्हाधिकारी म्हणून विमला आर., अमरावतीत पवनीत कौर, अकोल्यात निमा अरोरा, गोंदियात नयना गुंडे, वर्धेत प्रेरणा देशभ्रतार तर वाशिमच्या सीईओ म्हणून वसुमना पंत, बुलडाण्यात भाग्यश्री विसपुते व चंद्रपुरात मिताली सेठी या महिला अधिकारी रुजू झाल्या आहेत. प्रशासकीय पातळीवर झालेला हा पहिलाच बदल विदर्भ विकासासाठी ‘माईलस्टोन’ ठरणारा आहे.
विदर्भात एकूण ११ जिल्हे आहेत, तर अमरावती व नागपूर हे दोन विभाग आहेत. नागपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच विभागीय आयुक्तपद एका महिला अधिकाऱ्याकडे आले आहे. प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांचा आतापर्यंतचा कार्यकाळ अतिशय उत्कृष्ट राहिला आहे. विदर्भातील गोसीखुर्दसारखा महत्त्वाचा प्रकल्प तातडीने पूर्णत्वास नेण्यास त्यांच्या अनुभवाचा निश्चितच फायदा होईल. नागपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आर. विमला या राज्य ग्रामीण आजीविका मिशनच्या सीईओ असताना त्यांनी केलेले काम माइलस्टोन ठरले आहे. महिलांचे स्वयंसाहाय्यता गट स्थापून महिला सक्षमीकरणाचे काम त्यांनी केले. त्या उत्तम कवयित्रीसुद्धा आहेत.
पवनीत कौर यांनी जिल्हाधिकारी म्हणून नुकताच पदभार स्वीकारला असून, जिल्ह्यातील पुनर्वसन, कुपोषण आदी समस्या सोडविण्यासाठी योजनांना गती देतानाच पारदर्शकता व गतिमान प्रशासनावर भर देण्याचा विश्वास वर्तविला आहे. गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी यशदाचा उपमहासंचालक म्हणून कारभार पाहिला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षणाद्वारे अपडेट करण्याचे काम त्यांनी यावेळी केले आहे. वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार या कोरोनाकाळातील परिस्थिती अतिशय उत्तमरीत्या हाताळत आहेत. एकूणच या महिला अधिकारी आपल्या कर्तृत्वाने जिल्हा व विदर्भाला विकासाच्या दिशेने नेण्यास अग्रेसर आहेत.
कायदा व सुव्यवस्थाही
प्रशासकीय कामकाजासोबतच कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारीसुद्धा अमरावती जिल्ह्याच्या पोलीस आयुक्त असलेल्या आरती सिंह या महिलाच समर्थपणे करीत आहेत. आरती सिंह यापूर्वी नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक होत्या. त्यांचा कार्यकाळ हा अतिशय चांगला राहिला. ग्रामीण भागातील अवैध धंदे व गुन्हेगारी त्यांनी बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवली होती.