बँकांना फोनद्वारे लुटणारी टोळी उपराजधानीत सक्रिय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 10:07 AM2018-11-24T10:07:39+5:302018-11-24T10:09:20+5:30
बड्या व्यापारी ग्राहकांच्या नावाने बँकांना फोन करून लुटणारी टोळी नागपुरात सक्रिय झाली असल्याचे संकेत मिळाले. गेल्या दोन दिवसात अशा प्रकारच्या दोन घटना समोर आल्या आहेत.
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बड्या व्यापारी ग्राहकांच्या नावाने बँकांना फोन करून लुटणारी टोळी नागपुरात सक्रिय झाली असल्याचे संकेत मिळाले. गेल्या दोन दिवसात अशा प्रकारच्या दोन घटना समोर आल्या आहेत.
पहिली घटना स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सोमलवाडा शाखेत मंगळवारी घडली. बँकेचे पासिंग आॅफिसर अनिल भालेराव यांना विशाल बरबटे यांच्या नावाने फोन करून त्यांच्या बरबटे नेक्सा शोरूमच्या खात्यातून पाच लाख रुपये उत्तर प्रदेशातील गजरौला येथील जिंदल पाईप्सच्या खात्यात ट्रान्स्र करण्याची विनंती केली. त्यावर भालेराव यांनी पाच लाख जिंदल पाईप्सला पाठवून दिले.
थोड्यावेळाने त्याच फोनकर्त्याने भालेराव यांना फोन करून २,९८,००० रुपये पुन्हा तीन खात्यात पाठविण्याची विनंती केली. पण यावेळी भालेराव यांना शंका आल्याने त्यांनी बरबटे नेक्सा शोरूममध्ये संपर्क केला, तेव्हा अशी कुठलीही सूचना दिली नसल्याचे विशाल बरबटे यांनी सांगितले. भालेराव यांनी नंतर या रकमा पाठवल्या नाहीत. पण तरीही स्टेट बँकेला पाच लाखांचा फटका बसला आहे. स्टेट बँकेचे सोमलवाडा शाखा प्रमुख संदीप हजारे यांनी या प्रकरणाची तक्रार बुधवारी सोनेगाव पोलीस ठाण्यात केली असून तपास सुरू आहे. या प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच टेलिकॉमनगरमधील युनियन बँक आॅफ इंडियातही असाच प्रयत्न गुरुवारी झाला. शाखा व्यवस्थापक प्रतीककुमार यांना फोनकर्त्याने आपण अरुण फोर्ड शोरूमचे संचालक पाटणी बोलत असून आपल्या खात्यातून ६,५५,५१९ रुपये भोपाळ येथील आधार एंटरप्रायजेसच्या खात्यात पाठविण्याची सूचना दिली. प्रतीककुमार यांनी तसा ई-मेल पाठविण्याची विनंती फोनकर्त्याला केली. त्यावर फोनकर्त्याने कुणालपाटणी.फोर्ड@जीमेल.कॉम वरून तसा ई-मेल कुमार यांना केला. पण पाटणी कधीच फोनने बँक व्यवहार करत नसल्याने कुमार यांनी पाटणी यांच्याशी संपर्क साधला व हा बँकेला फसविण्याचा प्रयत्न असल्याचे सिद्ध झाले व युनियन बँकेची फसवणूक टळली.
पाटणी यांनी नागपूर येथील सायबर सेलमध्ये तक्रार केली आहे. वाहन विक्रेत्यांच्या बँक खात्यात नेहमीच किमान ५० लाख ते तीन कोटीपर्यंत रक्कम जमा असते. त्यामुळे फोनकर्त्याने आॅटोमोबाईल डिलर्सना लक्ष्य केल्याचे उघड आहे. बरबटे व पाटणी या दोघांनी पोलिसात धाव घेतली. पण फसवणूक झाल्यानंतर तक्रार केली तर इज्जतीचा भाजीपाला होईल असा विचार करून गप्प बसणारेही असू शकतात. या प्रकारात खातेदारांनी फोन वा सूचना दिली नसल्याने रकमेबाबत पूर्ण जबाबदारी बँक अधिकाºयांची आहे. त्यामुळे बँक अधिकाऱ्यांना अशा फोनपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे.