अंगणवाड्या आहेत की लहान मुलांचे कोंडवाडे? मदतनिसांना करावी लागते तारेवरची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2023 08:00 AM2023-07-15T08:00:00+5:302023-07-15T08:00:01+5:30
Nagpur News शहरातील काही अंगणवाड्यांना ‘लोकमत’च्या पथकाने भेट दिली असता, अतिशय विदारक परिस्थिती बघायला मिळाली. गळकी छते, भिंतींना ओल, मुलांना बसायलाही जागा नाही, सामान्यांचे बाथरूम तरी बरे, अशा अवस्थेत अंगणवाड्या सुरू आहेत.
मंगेश व्यवहारे
नागपूर : झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या कामगार, मजूर, कष्टकऱ्यांच्या मुलांना प्राथमिक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याबरोबरच पोषण आहाराच्या माध्यमातून त्यांचे आरोग्य जपण्यासाठी शहरी भागात अंगणवाड्या सुरू आहेत. पण ज्या सुविधा ग्रामीण भागातील अंगणवाड्यांना ग्रामपंचायत व स्थानिक लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून मिळतात, त्यापासून शहरी भागातील अंगणवाड्या कोसो दूर आहेत. महिला व बाल विकास विभाग फक्त योजना राबवावी, याच उद्देशातून शहराच्या अंगणवाड्यांचे संचालन करीत आहे.
शहरातील काही अंगणवाड्यांना ‘लोकमत’च्या पथकाने भेट दिली असता, अतिशय विदारक परिस्थिती बघायला मिळाली. गळकी छते, भिंतींना ओल, मुलांना बसायलाही जागा नाही, सामान्यांचे बाथरूम तरी बरे, अशा अवस्थेत अंगणवाड्या सुरू आहेत. शहरातील या अंगणवाड्यांना बघितल्यावर याला लहान मुलांचे कोंडवाडे असेच म्हणावे लागेल.
महापालिकेच्या हद्दीमध्ये एकात्मिक बालविकास सेवेचे सहा प्रकल्प असून, त्याअंतर्गत ९०० अंगणवाड्या कार्यरत आहेत. यामध्ये बहुतांश अंगणवाड्या स्लम भागात झोपडपट्ट्यांमध्ये आहे. ‘लोकमत’च्या पथकाने डिप्टी सिग्नल या स्लम वस्तीतील व कळमना चिखली झोपडपट्टीतील अंगणवाड्यांना भेट दिली. येथील एका एका अंगणवाडीमध्ये किमान ४० मुले आहेत. ७ बाय १० च्या रूममध्ये असलेली एक अंगणवाडी बघितली. अंगणवाडीत सामान इतकी होते की बसायला जागा नव्हती. पावसामुळे भिंत्यांना ओल आलेली होती. त्यामुळे अंगणवाडीत लावलेले चॅर्ट खराब झाले होते. एवढ्याशा जागेत अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि ४० विद्यार्थी कसे बसत असतील..? याच भागातील आणखी एका अंगणवाडीला भेट दिली. पाऊस असल्यामुळे अंगणवाडीसमोरील रस्ता पाण्याखाली आला होता. सुरुवातीला आम्हाला कळलेच नाही, की ती अंगणवाडी आहे. छायाचित्रकाराने सेविकेलाच विचारले, हे तर बाथरूम दिसते. एवढ्या छोट्याच्या जागेतील अंगणवाडीत ४० मुलांची नोंद होती. याच अंगणवाडीच्या मागच्या भागातील गल्लीमध्ये ८ बाय १० च्या खोलीत अंगणवाडी होती. भिंतीवर लावलेले पूर्व प्राथमिक शिक्षणाचे चार्ट, दोन खुर्च्या आणि अंगणवाड्यांना मिळणारे साहित्य व पोषण आहाराचे साहित्याने अंगणवाडी खचाखच भरली होती. येथेही ४२ मुलांची नोंद होती. ३ ते ६ वर्षांची बालकांना येथे पोषण आहार व पूर्व प्राथमिक शिक्षण मिळते. एवढ्याशा जागेत सेविका व मदतनीस कसे मॅनेज करतात, हे आश्चर्यकारकच होते.
- पाऊस आला आणि अंगणवाडीत लागल्या धारा
कळमना चिखलीमध्ये एका अंगणवाडीला भेट दिली. चार भिंती उभ्या करून सिमेंटचे पत्रे त्यावर टाकले होते. पण सिमेंटच्या पत्र्यांनाही भेगा पडल्या होत्या. आम्ही जाण्यापूर्वीच पाऊस येऊन गेला होता. सिमेंटच्या पत्रातून पावसाच्या धारा लागल्यामुळे सेविकेने मुलांना घरी पाठवून दिले होते. मदतनीस यांनी पाणी फेकून फ्लोअरिंग पुसून काढली होती. सेविका एका कोपऱ्यात टेबल टाकून लिखापडी करीत होत्या. पावसामुळे साहित्य खराब होत होते. विशेष म्हणजे अंगणवाडीच्या दाराला छिद्र पडली होती. दोन चिमुकली मुले त्यातून डोकावून बघत होती.
- अंगणवाड्यांची ही अवस्था का?
शहरातील सर्वच अंगणवाड्या किरायाच्या घरात आहेत. शासनातर्फे नुकताच ३ हजार रुपये भाडे करण्यात आले आहे. ३ हजार रुपये भाड्याच्या रूमसाठी काही निकष लावले आहे. त्या निकषामध्ये शहरातील झोपडपट्ट्यांमध्येही रूम मिळत नाही. त्यामुळे ७५० रुपये भाडे देऊन छोट्या छोट्या कोंडवाड्यात, गळक्या खोल्यांमध्ये अंगणवाडीचा कारभार सुरू आहे. विशेष म्हणजे, भाड्याचे पैसे सहा सहा महिने येत नसल्याने घर मालक अंगणवाडीसाठी जागाही द्यायला तयार नाही.