कोरोनातून बरे होऊन वर्ष लोटले तरी हाडे दुखण्याचा त्रास आहे का?, असू शकतो 'हा' आजार
By सुमेध वाघमार | Published: August 22, 2023 03:04 PM2023-08-22T15:04:42+5:302023-08-22T15:05:40+5:30
मेडिकलमध्ये २५ रुग्णांवर करावे लागले ‘हिप रिप्लेसमेंट’
सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाची दहशत संपून अडीच वर्षांचा कालावधी होऊनही काहींमध्ये या आजाराचे दुष्परिणाम आताही दिसून येत आहेत. विशेषत: ज्यांना सांधेदुखी आणि हाडे दुखण्याचा त्रास आहे, त्यांनी याला गंभीरतेने घ्यायला हवे. ‘अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस’ हा आजार असू शकतो. मेडिकलच्या अस्थिव्यंगोपचार विभागात कोरोना होऊन गेलेल्या या आजाराच्या २५ रुग्णांवर ‘हिप रिप्लेसमेंट’ची वेळ आली आहे, आणि आठवड्याला दोन ते तीन नवे रुग्ण आढळून येत आहेत.
कोरोनापूर्वी विशेषत: सिकलसेल, त्वचेचे विकार, अस्थमा, ऑटोइम्यून डिसीज असणाऱ्यांमध्ये ‘अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस’चे (एव्हीएन) आजार दिसून यायचा. परंतु, कोरोनाचा गंभीर लक्षणांतून बाहेर पडलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार दिसून येत असल्याचे मेडिकलच्या अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. सुमेध चौधरी यांनी सांगितले. त्यांच्यानुसार, अशा २५ रुग्णांवर ‘हिप रिप्लेसमेंट’ म्हणजे नितंबाच्या हाडाचे प्रत्यारोपण करावे लागले आहे. ही एक मोठी संख्या आहे.
-कारण काय?
डॉ. चौधरी म्हणाले, कोरोनामध्ये ‘स्टेरॉइड’ देण्याचे प्रमाण वाढले होते. याशिवाय, कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये रक्त गोठण्याची समस्या, छोट्या रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यांमुळे ‘अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस’ हा आजार होत असल्याचे दिसून येत आहे. डॉ. चौधरी यांनी सांगितले, मेडिकलमध्ये 'एव्हीएन'च्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात आलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील रुग्णांवर औषधोपचार आहेत.
- का होतो ‘एव्हीएन’ आजार?
जेव्हा हाडांच्या टिश्यूपर्यंत रक्त पोहोचत नाही, तेव्हा अशा परिस्थितीत ‘एव्हीएन’ या आजाराचा धोका निर्माण होऊ शकतो. हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो, मात्र सहसा २० ते ६० या वयोगटातील लोकांना याचा त्रास अधिक होताना दिसून येत आहे. डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले की, जेव्हा एखाद्या व्यक्तीचे हाड तुटते तेव्हा रक्त हाडांपर्यंत नीट पोहोचत नाही. तसेच दारूच्या अतिसेवनामुळेही हा आजार होतो.
- आजाराची लक्षणे वेळीच ओळखा
कोविडनंतर ‘अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस’ या आजाराच्या रुग्णांमध्ये लक्षणीयरीत्या वाढ झाली आहे. हा आजार ‘हिप’ व मांड्यासोबतच काही व्यक्तींचे कोपर आणि सांध्यामध्येही होऊ शकतो. या आजाराची लक्षणे वेळीच ओळखून त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. अन्यथा, या आजरामुळे हाडांचे संपूर्णपणे नुकसान होऊ शकते. ‘अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस’वर उपचार हा त्या आजाराची तीव्रता किती आहे त्यावर अवलंबून असतो.
- डॉ. सुमेध चौधरी, प्रमुख अस्थिव्यंगोपचार विभाग