शिक्षक फ्रंटलाईन वर्कर नाहीत काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:08 AM2021-03-05T04:08:45+5:302021-03-05T04:08:45+5:30
मौदा : गतवर्षी कोरोनाच्या संक्रमणामुळे जग थांबले. हे संक्रमण रोखण्यासाठी आणि नागरिकात प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यासाठी शासनस्तरावर आरोग्य विभाग, ...
मौदा : गतवर्षी कोरोनाच्या संक्रमणामुळे जग थांबले. हे संक्रमण रोखण्यासाठी आणि नागरिकात प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यासाठी शासनस्तरावर आरोग्य विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, तालुका प्रशासन व गाव प्रशासन यांनी मोलाची भूमिका वठविली. संक्रमण रोखण्यासाठी घरोघरी जाऊन कोरोनासदृश लक्षणे असणाऱ्या लोकांची माहिती व्हावी म्हणून शासनाने प्रत्येक गावात सर्वेक्षण सुरू केले.
सप्टेंबर महिन्यात संक्रमणाचा वेग अधिक वाढला. अशावेळी घराच्या बाहेर निघणेही कठीण होते. अशातच तालुका प्रशासनाने सरकारी व खासगी शाळातील शिक्षकांना सर्वेक्षणाच्या कामाला लावले. प्रत्येक शिक्षकाला ५० कुटुंब देऊन सर्वेक्षणाचे कार्य जवळपास तीन ते चार महिने करण्यात आले. यात काही शिक्षक बाधित झाले तर काहींचा मृत्यू झाला. आता कोविड लसीकरण सुरू झाले आहे. लसीकरण मोहिमेत सर्वात प्रथम आरोग्य कर्मचारी, पोलीस विभाग, आशा वर्कर अशांना फ्रंटलाईन वर्कर संबोधण्यात आले. परंतु त्याच काळात खासगी शिक्षकांनी या सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले असतानाही त्यांना अजूनपावेतो लस देण्यात आली नाही. लसीकरण मोहिमेत शिक्षकांकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले. प्रशासनाने याची दखल घेत फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या खासगी शिक्षकांना कोविड लसीकरण मोफत करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात आहे.