पाळीव कुत्रे न बांधल्यावरून ‘राडा’, दोन कुटुंबातील वाद पोहोचला पोलीस ठाण्यात
By योगेश पांडे | Published: April 18, 2023 05:52 PM2023-04-18T17:52:45+5:302023-04-18T17:53:21+5:30
Nagpur News जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुत्र्यांवरूनच दोन कुटुंबे एकमेकांशी भिडली. पाळीव कुत्रे न बांधल्याच्या कारणावरून तुफान राडा झाला व अखेर दोन्ही कुटुंबांतील सदस्यांनी एकमेकांविरोधात तक्रारी केल्या
योगेश पांडे
नागपूर : घरांमध्ये कुत्रे पाळत असताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते, मात्र अनेक जण कुत्र्यांमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्यांकडे दुर्लक्ष करतात व त्यातून नाहक वाद होतात. जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुत्र्यांवरूनच दोन कुटुंबे एकमेकांशी भिडली. पाळीव कुत्रे न बांधल्याच्या कारणावरून तुफान राडा झाला व अखेर दोन्ही कुटुंबांतील सदस्यांनी एकमेकांविरोधात तक्रारी केल्या. पोलिसांनी दोन्ही कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कामठीतील धोबी चौकाजवळ मो. इकबाल उर्फ मो. ग्यासुद्दीन (३३) हा कुटुंबीयांसह राहतो. त्याच्या शेजारी मुन्नास्वामी पिल्ले नामक व्यक्ती कुटुंबीयांसह राहते. पिल्लेकडे दोन पाळीव कुत्रे आहेत व बरेचदा ते कुत्रे बांधलेले नसतात, तसेच बाहेर फिरत असतात. इकबालच्या तक्रारीनुसार, १६ एप्रिलच्या रात्री इकबालच्या घरातील लहान मुले खेळण्यासाठी बाहेर आली. त्याच वेळी कुत्रे बांधले नसल्याने बाहेर फिरत होते व ते मुलांच्या दिशेने धावत आले. हे पाहून इकबालने पिल्लेला कुत्रे का बांधत नाही, असा जाब विचारला. यावरून पिल्ले व इकबालमध्ये वाद सुरू झाला. त्याची मुले निशांत व लोकनाथन हेदेखील बाहेर आले. निशांतने इकबालचा भाऊ मो. जुबेरला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. इकबालने मध्यस्थी केली असता त्यालादेखील लाकडाच्या दांड्याने मारले. तोच दांडा जुबेरच्या डोक्यावर मारला व त्यात तो जखमी झाला. दोन्ही भावांना वस्तीतील लोकांनी पोलिस ठाण्यात नेले व पोलिसांनी तेथून रुग्णालयात नेले. इकबालच्या तक्रारीवरून पोलिसांनी पिल्ले व दोन्ही मुलांविरोधात गुन्हा दाखल केला.
तर दुसरीकडे पिल्लेनेदेखील शेजारच्या कुटुंबाविरोधात पोलिसांत तक्रार दिली. पिल्लेच्या तक्रारीनुसार मो. इकबाल मो. ग्यासुद्दीन, जुबेर, इकबाल अन्सारी, बबलू अन्सारी व अक्रम अन्सारी हे रात्री साडेदहाच्या सुमारास घराबाहेर उभे होते. कुत्र्यांना बांधून का ठेवत नाही असे म्हणत त्यांनी वाद करण्यास सुरुवात केली. त्यानंतर शिवीगाळ करत घरात शिरले व मला तसेच मुलांना मारहाण केल्याचा दावा पिल्लेने तक्रारीत केला. पोलिसांनी पिल्लेच्या तक्रारीवरून चारही जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलिस करत आहेत. मात्र कुत्र्यांमुळे झालेल्या या वादाची चर्चा परिसरात चांगलीच रंगली होती.