वाद पेटला, आ. आशिष जयस्वालांना उत्तर देण्यासाठी कुमेरिया मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2022 10:56 AM2022-07-08T10:56:54+5:302022-07-08T11:12:38+5:30
शिवसैनिकांना भाजपसोबत युती नको म्हणणारे आता भाजपची चाकरी करत आहेत, अशी टीकाही कुमेरिया यांनी केली.
नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेले रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांना उत्तर देण्यासाठी शेवटी नागपूरचे जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया मैदानात उतरले आहेत. २०१९मध्ये भाजप-शिवसेना युतीत रामटेकची जागा भाजपला सुटली तेव्हा जयस्वाल हे बंडखोरी करत अपक्ष म्हणून भाजपविरोधात लढले. त्यावेळी त्यांचे हिंदुत्व कुठे गेले होते, असा सवाल कुमेरिया यांनी केला आहे. तर त्या निवडणुकीत शिवसैनिकांच्या भरवशावर आपण निवडून आलात, याचे स्मरणही त्यांनी करून दिले आहे.
कुमेरिया म्हणाले, आमदार जयस्वाल यांना शिवसेनेने रामटेक विधानसभेची संपूर्ण जबाबदारी दिली होती. जयस्वाल यांनी पक्षाचा विश्वासघात केला, पक्षाच्या शिवसैनिकाला मोठे करायचे सोडून त्यांनी आपल्या जवळच्या काहीच लोकांना मोठे केले. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जयस्वाल यांचा पराभव केला. तो पराभव शिवसैनिकांच्या जिव्हारी लागला होता.
२०१९मध्ये युती झाली व रामटेकची जागा भाजपच्या वाट्याला गेली. आता हिंदुत्वाची माळ जपणारे जयस्वाल यांनी त्यावेळी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. शिवसैनिकांना भाजपसोबत युती नको म्हणणारे आता भाजपची चाकरी करत आहेत, अशी टीकाही कुमेरिया यांनी केली.
मुख्यमंत्रिपदात जादू असते, मग येथे सोबतचेही सोडून का गेले ?
जयस्वाल यांची तडफड मंत्रिपदासाठी
पक्ष ही वैयक्तिक मालमत्ता नाही, आमदार जयस्वाल यांनी केलेले वक्तव्य अशोभनीय आहे. केवळ मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांची ही तडफड आहे. मंत्रिपदाच्या लालसेपोटी व ईडीच्या भीतीने आपण शिंदे गटात गेलात, हे मान्य करा, असा टोलाही कुमेरिया यांनी जयस्वाल यांना लगावला आहे.
काय म्हणाले होते जयस्वाल
राज्याच्या मुख्यमंत्रिपदामध्ये एक जादू असते. त्या पदाचा वापर करून मुख्यमंत्री विरोधकांनाही आपलेसे करून टाकतात. पण येथे मुख्यमंत्रिपद असतानाही पाठिंबा देणारे अपक्ष तर गेलेच, पण सोबतचे आमदारही का गेले, याचे आत्मचिंतन आपण करणार की नाही? असा सवाल शिंदे गटात सामील झालेले रामटेकचे आ. आशिष जयस्वाल यांनी केला होता.