सिगारेट ओढण्यावरून वाद, तरुणींनी सहकाऱ्यांच्या मदतीने केली तरुणाची हत्या
By योगेश पांडे | Published: April 7, 2024 10:42 PM2024-04-07T22:42:39+5:302024-04-07T22:42:51+5:30
हुडकेश्वरमध्ये खळबळ
नागपूर : सिगारेट ओढताना क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून दोन तरुणींनी मित्रांच्या मदतीने तरुणाची हत्या केली. हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या महालक्ष्मी नगरमध्ये शनिवारी रात्री ही घटना घडली.
रणजित बाबूलाल राठोड (२८, ज्ञानेश्वर नगर) असे मृताचे नाव आहे. तर जयश्री दीपक पानझारे (३०, विजयालक्ष्मी पंडित नगर, नंदनवन), सविता यशवंत सायरे (२४, आंबेडकर नगर, वाडी) आणि आकाश दिनेश राऊत (२६, विजयालक्ष्मी पंडितनगर, नंदनवन) हे आरोपी आहेत. रणजीत कपडे विकायचा आणि किराणा दुकान चालवायचा. सिद्धेश्वर सभागृहाजवळ लक्ष्मण तावडेचा पानठेला आहे. रणजीत तिथे सिगारेट ओढायला यायचा. शनिवारी रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारेस त्याने पानठेल्यावरून सिगारेट खरेदी केली. त्याच क्षणी जयश्रीने मागून येऊन तेथून सिगारेट विकत घेतल्याचे सांगितले जाते.
कुतूहलाने रणजीतने मागे वळून जयश्रीकडे पाहिले. सिगारेट ओढत असताना जयश्रीने त्याचा धूर रणजीतच्या तोंडावर सोडला. त्याला पाहून रणजीतने टोमणा मारला. जयश्रीने रणजीतला 'काय बघतो आहेस' असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सविताही काही अंतरावर उभी होती. रणजीतनेदेखील जयश्रीला शिवीगाळ केली. त्याचवेळी लक्ष्मण हा परिचितासोबत दुसऱ्या मुद्द्यावर बोलत असताना हसत होता. तो आपल्यावर हसत असल्याचा जयश्रीला संशय आला. तिने फोन करून मित्राला तिथे यायला सांगितले. दरम्यान लक्ष्मण पानाचा स्टॉल बंद करून घरी गेला. रणजीतही मित्रासोबत काही अंतरावर जाऊन बोलू लागला. सविता, आकाश राऊत व आणखी एका मित्रासह जयश्री तेथे पोहोचली. त्यांनी रणजीतवर हल्ला केला. त्याला चाकूने मारून ते पळून गेले. घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रणजीतला रुग्णालयात नेले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
क्लिपिंगमुळे समोर आला प्रकार
जयश्री शिवीगाळ करत असताना रणजीतने मोबाईलमधून क्लिपिंग बनवली होती. त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्हीचीदेखील मदत घेण्यात आली. ओळख पटल्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आले. तिने इतर साथीदारांची नावे सांगितली.