वाडीत वरातीत नाचण्यावरून वाद, दोन गटात तुफान राडा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 12:04 PM2023-04-25T12:04:37+5:302023-04-25T12:05:54+5:30
गुन्हे दाखल, वाडीतील आंबेडकरनगरात तणाव
नागपूर : लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून वाडीतील गुंड बबलू वानखेडे याने साथीदारांच्या मदतीने रविवारी रात्री एका तरुणाला मारहाण करत एका घराची तोडफोड केली. या घटनेचा बदला घेण्यासाठी तरुणाच्या नातेवाईक व मित्रांनीदेखील बबलूच्या घरावरही हल्ला केला. वाडी पोलिसांनी तीन गुन्हे दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेनंतर वाडीतील आंबेडकरनगरात तणाव होता.
आंबेडकरनगर येथील रहिवासी असलेल्या लोखंडे कुटुंबीयांच्या घरी रविवारी रात्री विवाह सोहळा होता. रात्री नऊ वाजता मिरवणूक निघाली व नाचत असताना धक्का लागल्याने बबलूचा वस्तीतील ऋषी रंगारी यांच्याशी वाद झाला. दोघांमध्ये हाणामारी झाल्याने मिरवणुकीत सहभागी लोकांनी मध्यस्थी करून त्यांना शांत केले. या घटनेने संतप्त झालेल्या बबलूने आपल्या दहा ते बारा साथीदारांना एकत्र केले आणि रात्री अकरा वाजता ऋषीच्या घरी पोहोचला. ते ऋषींचा शोध घेऊ लागले. ऋषी न सापडल्याने घराची तोडफोड करण्यात आली. तेथून परतत असताना ऋषीचा साथीदार साहिल जंगले (२१) हा दिसला व त्याच्यावर चाकूने हल्ला करत त्याला गंभीर जखमी करण्यात आले.
साहिलवर झालेल्या हल्ल्यामुळे त्याचे कुटुंबीय आणि मित्र संतप्त झाले. साहिलच्या वडिलांनी मित्रांच्या मदतीने बबलूच्या घरावर हल्ला केला व त्याच्या घराचीही प्रचंड तोडफोड करण्यात आली. या घटनेने आंबेडकरनगरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी बबलूविरुद्ध ऋषी रंगारीच्या घरावर हल्ला आणि साहिल जंगले याच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल केले. तर साहिल जंगलेचे वडील आणि साथीदार राज मेश्राम यांना अटक करून तोडफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. बबलूवर यापूर्वीच प्राणघातक हल्ला आणि शस्त्र प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. बबलू आणि त्याचा गुन्हेगार साथीदार पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यांचा शोध सुरू आहे.