पैशांवरून वाद, धक्का अन थेट चाकूने हत्याच; मध्यरात्रीनंतर शांतीनगरात थरार
By योगेश पांडे | Published: April 4, 2024 04:28 PM2024-04-04T16:28:02+5:302024-04-04T16:29:05+5:30
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त असताना तरुणांचे टोळके बाहेर फिरतातच कसे असा सवाल उपस्थित होत आहे.
नागपूर : पैशांवरून वाद सुरू असताना मध्यस्थी करताना धक्का लागल्याने आरोपीने एका तरुणाचा चाकूने भोसकून खून केला. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यादव कॉलनीत ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त असताना तरुणांचे टोळके बाहेर फिरतातच कसे असा सवाल उपस्थित होत आहे.
विजय हरिचंद्र चौहान (३३, द्वारका नगर, कळमना) असे मृतकाचे नाव आहे. तर सागर यादव (३०, यादव कॉलनी, शांतीनगर) व हर्षल कटारे (२७, तुलसीनगर, शांतीनगर) हे आरोपी आहेत. विजयचे यशोधरानगर रेल्वे क्रॉसिंगला कपड्यांचे दुकान होते मात्र रेल्वे पुलाचे काम सुरू असल्याने काही काळापासून तो घरीच होता. बुधवारी साडेदहा वाजताच्या सुमारास तो त्याचे मित्र बादल बरमकर, सूरज बंबानी, सय्यद शहाबाज सय्यद मुजफ्फर यांच्यासोबत बाहेर गेला. ते सागरला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले. सागर तेथे हर्षलसोबत उभा होता.
सागरच्या घराजवळील सिमेंट रस्त्यावर उभे राहून सर्व बोलत होते. सागरने सुजयला खर्चासाठी पैसे मागितले. त्यांच्यात त्या कारणावरून वाद सुरू झाला. त्यामुळे बादल व विजयने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यात विजयचा सागरला धक्का लागला. यावरून सागर संतापला व त्याने हर्षलला चाकू देण्यास सांगितले. हर्षलने चाकू देताच कुणाला काही कळण्याच्या आतच शिवीगाळ करत सागरने विजयवर चाकूने वार करणे सुरू केले. त्याने विजयच्या पोट, छाती, हाताचे कोपर, दंडावर वार केले. यात विजय गंभीर जखमी झाला. आरोपी तेथून फरार झाले. विजयच्या मित्रांनी त्याला ऑटोने मेयो इस्पितळात नेले व त्याच्या कुटुंबियांना माहिती दिली. डॉक्टरांनी विजयला मृत घोषित केले. त्याचे मोठे भाऊ दिलीप यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने हर्षल कटारे याला अटक केली तर सागरचा शोध सुरू आहे.
पोलिसांकडून टोळक्यांकडे दुर्लक्ष
नागपूर शहरात आचारसंहिता लागू असून गुन्हेगारी हालचालींवर बारीक नजर असल्याचा दावा पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. प्रत्यक्षात मध्यरात्रीनंतर शहरातील अनेक भागांमध्ये तरुणांची टोळकी थिल्लरबाजी करत बसलेली किंवा फिरताना दिसून येतात. त्यांच्यावर वचक आणण्यासाठी पोलिसांकडून कुठलेही प्रयत्न सुरू नसल्याचे चित्र आहे.