दुचाकी वेगात चालविण्यावरून वाद, चाकूने भोसकून हत्या; नागपुरात तीन दिवसांत तीन हत्या
By योगेश पांडे | Published: June 10, 2024 04:23 PM2024-06-10T16:23:28+5:302024-06-10T16:25:05+5:30
पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह.
योगेश पांडे, नागपूर : दुचाकी वेगात चालविण्याच्या मुद्द्यावरून वाद घालत तीन आरोपींनी एका व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या केली तर त्याच्या सहकाऱ्यास गंभीर जखमी केले. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. तीन दिवसांतील ही तिसरी हत्या असून पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारांवर वचक राहिला आहे की नाही असाच प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
दिलीप बहालराम शाहू (३४, कैकाडीनगर झोपडपट्टी, बेलतरोडी) असे मृतकाचे नाव आहे, तर त्याचा सहकारी पियूष बंडूजी सोनटक्के (२०, रामटेकेनगर) हा जखमी आहे. रविवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास व्हाईट हाऊस बिल्डींगच्या बाजुच्या मार्गावरून दिलीप हा पियुषला गाडीवर मागे बसवून चालला असताना कैकाडीनगर झोपडपट्टीतीलच गणेश बबला शाहू (२१), पियुष सुंंदर लिल्लारे (२१) व आकाश सुदामा लिल्लारे (२१) यांनी त्यांना थांबविले. दुचाकी इतक्या वेगाने का चालवत आहे अशी विचारणा करत तिघांनीही दिलीपला शिवीगाळ सुरू केली. तिघांनीही दोघांनाही बेदम मारहाण केली व चाकूने वार केले. यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर घटनास्थळावरून आरोपी फरार झाले. त्यांना मेडिकल इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी दिलीपला मृत घोषित केले तर पियुषवर उपचार सुरू आहेत.
गिता शाहू यांच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलीस ठाण्यात तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व त्यांना अटक करण्यात आली. मागील तीन दिवसांतील ही तिसरी हत्या आहे.