गाडीत विटा भरण्यावरून वाद, मारहाणीत वाहन चालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 01:18 PM2023-10-16T13:18:25+5:302023-10-16T13:18:43+5:30
खुनाचा गुन्हा दाखल : आराेपी कामगारास अटक
बुटीबोरी (नागपूर) : वाहनात विटा भरण्यावरून उद्भवलेला वाद विकाेपास गेल्याने वाहन चालक व कामगारात भांडण सुरू झाले. या भांडणात कामगाराने वाहन चालकास लाेखंडी राॅडने बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुटीबाेरी एमआयडीसी परिसरातील कंपनीत रविवारी (दि. १५) दुपारी १२:३० ते १ वाजताच्या दरम्यान घडली. विशेष म्हणजे, दाेघेही एकाच कंपनीत नाेकरी करीत असून, आराेपी कामगारास अटक करण्यात आल्याचे ठाणेदार महादेव आचरेकर यांनी सांगितले.
शांताराम मोरे (वय ५२, रा. प्रभाग क्रमांक-३, बुटीबोरी, ता. नागपूर ग्रामीण) असे मृताचे, तर जयकुमार भली मडावी (रा. सुचामेटा, ता. घनसोर, जिल्हा शिवनी, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आराेपी कामगाराचे नाव आहे. बुटीबाेरी एमआयडीसी परिसरातील वेदसिद्ध प्रॉडक्ट प्रा. लिमिटेड येथे सिमेंटच्या विटांचे उत्पादन केले जात असून, दाेघेही या कंपनीत नाेकरी करायचे.
शांताराम रविवारी सकाळी १० वाजता नेहमीप्रमाणे कामावर गेला हाेता. दुपारी वाहनात विटा भरण्यावरून त्याचे व जयकुमारचे भांडण सुरू झाले. या भांडणात जयकुमारने शांतारामला लाेखंडी राॅडने बेदम मारहाण केल्याने ताे गंभीर जखमी झाला. त्यामुळे इतर कामगारांनी त्याला लगेच बुटीबाेरी शहरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती केले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
माहिती मिळताच ठाणेदार महादेव आचरेकर, सहायक पाेलिस निरीक्षक सुमंतराज भुजबळ, विनायक सातव यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. याप्रकरणी एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिसांनी आकाश मोरे याच्या तक्रारीवरून भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपी जयकुमारला ताब्यात घेत अटक केली.
२.५० लाख रुपये देण्याची घाेषणा
मृत शांताराम माेरे यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. हा तिढा साेडविण्यासाठी उपविभागीय पाेलिस अधिकारी पूजा गायकवाड, कामगार नेते बल्लू श्रीवास व कंपनी व्यवस्थापनात बैठक पार पडली. या बैठकीत मृत शांतारामच्या कुटुंबीयांना कंपनीकडून २ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत तसेच विम्याचे पाच लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती बल्लू श्रीवास यांनी दिली.