क्षुल्लक कारणावरून तरुणांमध्ये वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:07 AM2021-06-02T04:07:39+5:302021-06-02T04:07:39+5:30

एकाला भोसकले : इमामवाड्यात गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : क्षुल्लक कारणावरून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान चौघांनी एका ...

Arguments among young people for trivial reasons | क्षुल्लक कारणावरून तरुणांमध्ये वाद

क्षुल्लक कारणावरून तरुणांमध्ये वाद

Next

एकाला भोसकले : इमामवाड्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : क्षुल्लक कारणावरून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान चौघांनी एका तरुणाला चाकूने भोसकण्यात झाले. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री ही घटना घडली. आर्यन कालिदास राऊत (वय १८), असे जखमीचे नाव आहे.

रविवारी एका लग्नात आर्यन, तसेच आरोपी कुणाल सुहास वाघ (वय २२) आणि हिमांशू दिनेश रॉय (वय १९, रा. जाटतरोडी, इंदिरानगर) हे सोबत गेले होते. एका आरोपीने वेडीवाकडी केशभूषा केल्यामुळे जेवण करताना आर्यन त्याच्याकडे पाहून हसला. तो खिल्ली उडवीत असल्याचे वाटल्यामुळे आरोपी रॉय आणि वाघ यांच्यासोबत त्याचा वाद झाला. तेथे कसेबसे निपटल्यानंतरही त्यांच्यात धुसफूस सुरूच होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास आर्यन राऊत त्याच्या घराजवळ उभा असताना आरोपी रॉय, वाघ आणि त्यांचे दोन अल्पवयीन साथीदार तेथे आले. तू आमच्याकडे पाहून का हसत होतास, असा सवाल करून त्यांनी वाद सुरू केला. प्रकरण हाणामारीवर गेले. कबड्डीपटू असलेल्या आर्यनने आरोपींना चांगलाच चोप दिला. त्यामुळे त्यांच्यातील एकाने आर्यनवर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. माहिती कळताच इमामवाडाचे ठाणेदार मुकुंद साळुंके आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. त्यांनी धावपळ करून आरोपी रॉय आणि वाघ या दोघांना अटक केली. अल्पवयीन साथीदारांची चौकशी सुरू आहे.

----

जखमीवर उपचार सुरू

जखमी आर्यनवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

---

Web Title: Arguments among young people for trivial reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.