गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यावरून तर्कवितर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2023 10:56 PM2023-04-26T22:56:03+5:302023-04-26T22:57:06+5:30
Nagpur News केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या गुरुवारच्या नागपूर दौऱ्याबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या गुरुवारच्या नागपूर दौऱ्याबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या निधनामुळे दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उद्घाटनाला उपस्थित राहतील की नाही याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.
नियोजित कार्यक्रमानुसार २७ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत व ते बुधवारी रात्री १० वाजता नागपुरात येणार होते. मात्र, गृहमंत्री बुधवारी रात्री उशिरापर्यंत नागपुरात आले नव्हते. जामठा येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेदेखील उपस्थित राहणार आहेत. मात्र, राष्ट्रीय दुखवटा असल्याने गृहमंत्री या कार्यक्रमात सहभागी होतील की नाही याबाबत विविध चर्चांना उधाण आले होते. याबाबत प्रशासकीय पातळीवरून कुणीही अधिकृत माहिती दिली नाही. मात्र, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तांत्रिक कारणांमुळे गृहमंत्री येण्याची शक्यता कमी असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.