सशस्त्र हल्लेखोरांचा नागपुरातील पेट्रोल पंपावर दरोडा; ४० हजार घेऊन फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 10:08 AM2018-02-08T10:08:40+5:302018-02-08T10:10:34+5:30
शस्त्रासह आलेल्या हल्लेखोरांनी प्रतापनगरच्या पडोळे चौक येथील पेट्रोल पंपावर हल्ला चढवून रोखपालाला जखमी करून लुटले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शस्त्रासह आलेल्या हल्लेखोरांनी प्रतापनगरच्या पडोळे चौक येथील पेट्रोल पंपावर हल्ला चढवून रोखपालाला जखमी करून लुटले. मंगळवारी रात्री झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. एका महिन्यात पेट्रोल पंपावर दरोडा पडण्याची ही दुसरी घटना आहे.
पडोळे चौकात नितीन ग्रोवर यांचा पेट्रोल पंप आहे. मंगळवारी रात्री ११ वाजता ग्राहक नसल्यामुळे पंपावरील तीन कर्मचारी चौकीदारासोबत चर्चा करीत होते. त्याच वेळी तोंडाला स्कार्फ बांधलेले सहा गुन्हेगार तेथे आले. दोघांनी रोखपाल संजय बावणेला पकडले. इतर चौघांनी दोन-दोनचा गट करून चौकीदार आणि इतर तिघांना घेरले. सर्वांच्या जवळ धारदार शस्त्र होते. चौकीदार आणि इतर कर्मचाऱ्यांना चाकू दाखवून शांत राहण्यास सांगितले. चौकीदाराला जीवे मारण्याची धमकी दिली.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे संजय बावणे आणि त्यांचे सहकारी घाबरले. गुन्हेगारांना संजयजवळ पैसे असल्याची माहिती होती. त्यांनी संजयला पैसे काढण्यास सांगितले. संजयच्या खिशातून पाकीट निघत नव्हते. आरोपींनी त्याला खाली पाडले. चाकूने हातापायावर वार करून त्याला जखमी केले. संजयवर हल्ला केल्यामुळे इतर सहकाऱ्यांनी गप्प राहणे पसंत केले. त्याचा फायदा घेऊन गुन्हेगार संजयपासून ४० हजार रुपये आणि मोबाईल घेऊन फरार झाले. त्यानंतर संजयने मालक आणि पोलिसांना सूचना दिली. प्रतापनगरचे उपनिरीक्षक के. आर. घोळवे त्वरित घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा प्रयत्न केला असता, तोही एक महिन्यापासून बंद असल्याची माहिती मिळाली. पंपाच्या जवळच बँक आहे. बँकेसमोर सीसीटीव्ही आहे. पोलिसांनी तात्काळ बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनीही बँकेच्या बाहेरील कॅमेरा बंद असल्याचे सांगितले. दरम्यान, पोलिसांनी तपास सुरू केला, परंतु त्यांना यश मिळाले नाही. रात्री ९ वाजता कर्मचाऱ्यांनी दिवसभराच्या विक्रीतून आलेली रक्कम मालकाला सोपविली होती. यामुळे आरोपींना मोठी रक्कम मिळाली नाही. आरोपींना पेट्रोल पंपाबाबत माहिती असल्याची पोलिसांना शंका आहे. त्यांना सीसीटीव्ही बंद असल्याचेही माहीत होते. पंपाच्या मालकानुसार काही दिवसांपूर्वीच शेडचे बांधकाम सुरू झाले होते. यामुळे सीसीटीव्ही बंद होता. प्रतापनगर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
यापूर्वी नरेंद्रनगरमधील वैष्णवी पेट्रोलपंपावरही अशाच प्रकारची घटना घडली होती.