पहाटे पहाटे दरोडेखोर घरात घुसले, नवदाम्पत्याला वेठीस धरून रोख व दागिने लुटून नेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 11:57 AM2021-12-14T11:57:00+5:302021-12-14T14:13:11+5:30

घराच्या दाराला गिरमिटने छिद्र पाडून दार उघडल्यानंतर सात दरोडेखोर घरात शिरले. त्यांनी मंगेश तसेच त्यांची पत्नी स्नेहा यांना घातक शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली व ३० हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने लुटून नेले.

Armed rdacoits looted cash and jewellery from a house in Shivangaon Colony Nagpur | पहाटे पहाटे दरोडेखोर घरात घुसले, नवदाम्पत्याला वेठीस धरून रोख व दागिने लुटून नेले

पहाटे पहाटे दरोडेखोर घरात घुसले, नवदाम्पत्याला वेठीस धरून रोख व दागिने लुटून नेले

Next
ठळक मुद्देशिवणगाव पुनर्वसन कॉलनीत दरोडा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शिवनगाव पुनर्वसन कॉलनीत सोमवारी पहाटे सशस्त्र दरोडेखोरांनी मोठा हैदोस घातला. प्रारंभी सीआरपीएफ जवानाच्या घराचे दार तोडून आतमधील साहित्य हुडकले. नंतर नवदाम्पत्याला वेठीस धरून ३० हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने लुटून नेले. दरोड्याची ही घटना चर्चेला आल्यानंतर परिसरात प्रचंड दहशत पसरली.

शिवनगाव पुनर्वसन सेक्टर ३४ मध्ये मंगेश देवराव वांदरे (वय ३२) राहतात. मूळचे शिवनगावचे रहिवासी असलेल्या मंगेशला आणखी दोन भाऊ आहेत. ते गावातच राहतात. तर चार महिन्यांपूर्वी लग्न झालेले मंगेश पत्नीसह पुनर्वसन सेक्टरमध्ये राहतात. त्यांच्या घराच्या दाराला गिरमिटने छिद्र पाडून दार उघडल्यानंतर सोमवारी पहाटे सात दरोडेखोर घरात शिरले. त्यांनी मंगेश तसेच त्यांची पत्नी स्नेहा यांना घातक शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली.

आरोपी मंगेश आणि स्नेहाकडे सहा लाख रुपये आणि दागिन्यांबाबत वारंवार विचारणा करीत होते. मंगेशला ते संजू भाऊ म्हणत हिंदी तसेच मराठी भाषेचा वापर करीत होते. रोख आणि दागिने दिले नाही तर जीवे ठार मारू, अशी धमकी देत होते. आमचे आताच लग्न झाले आहे. आमच्याकडे हे आहे ते सर्व न्या, आम्हाला दुखापत करू नका, अशी विनवणी मंगेश आणि स्नेहाने दरोडेखोरांना केली. त्यावर एका दरोडेखोराने, त्यांना ओरडू नका, तुम्हाला दुखापत करणार नाही, असे म्हणत आश्वस्त केले. एक दरोडेखोर मात्र सारखी शिवीगाळ करून मारण्याची धमकी देत होता. त्यांनी सगळे घर हुडकून साहित्य अस्तव्यस्त केल्यानंतर रोख ३० हजार, मंगेश तसेच स्नेहाकडील सोन्याच्या अंगठ्या, सोनसाखळी, लॅपटॉपसह लाखोंचा ऐवज लुटून नेला.

विशेष म्हणजे, या घटनेच्या पूर्वी वांद्रे यांच्या बाजूला राहणाऱ्या कृष्णा हिवराळे या सीआरपीएफ जवानाच्या घरात शिरले. हिवराळे सध्या भोपाळ (मध्य प्रदेश)मध्ये कर्तव्यावर असल्यामुळे त्यांचा परिवारही तिकडेच आहे. त्यामुळे हे घर रिकामेच आहे. घरात एक लॅपटॉप होता. मात्र, दरोडेखोरांनी त्याला हात लावण्याचे टाळले. तेथून निघाल्यानंतर दरोडेखोरांनी वांद्रे यांच्या घरावर मोर्चा वळविला. तेथे दरोडा घातल्यानंतर या भागातील त्यांनी एक मोटारसायकलही चोरून नेल्याचा संशय आहे.

वर्धा मार्गावर गस्तीवरील पोलिसांच्या नजरेस पडताच त्या मोटारसायकलस्वाराचा पोलिसांनी पाठलाग केला. मात्र, मोटारसायकल दुभाजकावर धडकवून आरोपी पळून गेला. दरम्यान, दरोडेखोर निघून गेल्याची खात्री पटल्यानंतर वांद्रे दाम्पत्याने बेलतरोडी पोलिसांना या घटनेची माहिती कळविली. त्यानंतर पोलिसांचा मोठा ताफा तिकडे पोहोचला. मंगेश यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला. बेलतरोडी तसेच गुन्हे शाखेची पथके दरोडेखोरांचा शोध घेत असून, काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही त्यांनी ताब्यात घेतले आहे. वृत्त लिहिस्तोवर दरोडखोरांचा छडा लागला नव्हता.

खानपानाचे साहित्यही फस्त

वारंवार सहा लाखांची मागणी दरोडेखोरांनी केल्यामुळे त्यांना मंगेशच्या घरी सहा लाख रुपये असल्याची कुणी तरी टीप दिली असावी, असा संशय आहे. विशेष म्हणजे, दरोडेखोरांनी घरातील रोख आणि दागिने लुटून नेताना मंगेशच्या घरातील खानपानाचे साहित्यही फस्त केले.

४५ मिनिटे होते दरोडेखोर

मंगेशच्या घरात दरोडेखोर साधारणतः ४५ मिनिटे होते. त्यांच्यातील काहींनी बरमुडा घातला होता, तर काही पूर्ण कपडे घालून होते. प्रत्येकाच्या तोंडावर स्कार्फ होते. हिंदी आणि मराठी भाषेचा ते वापर करीत होते. त्यामुळे दरोडेखोरांमध्ये काही स्थानिक आरोपी असावे, असा संशय आहे. विशेष म्हणजे, पंधरवड्यात शहरात घडलेली दरोड्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी गिट्टीखदान (दाभा) परिसरात एका वृद्धेच्या घरात दरोडा पडला. त्याचा अद्याप शोध लागलेला नाही.

Web Title: Armed rdacoits looted cash and jewellery from a house in Shivangaon Colony Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.