अर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान यांची नागपुरात अल्पविश्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 10:00 PM2019-07-09T22:00:05+5:302019-07-09T22:01:18+5:30
अर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान हे आज हनोई (व्हिएतनाम) येथून अर्मेनियाकडे परतण्यापूर्वी नागपूर विमानतळावर उतरले. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी त्यांचे नागपूर विमानतळावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे आणि पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान हे आज हनोई (व्हिएतनाम) येथून अर्मेनियाकडे परतण्यापूर्वी नागपूर विमानतळावर उतरले. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी त्यांचे नागपूर विमानतळावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे आणि पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित उपस्थित होते.
व्हिएतनामला जाण्यापूर्वी ४ जुलैला पंतप्रधान निकोल पाशिनयान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबले होते. त्यांनी जिल्हाधिकारी मुदगल यांच्याकडून नागपूरच्या प्रगतीचा आलेख समजून घेतला होता. येथील प्रशासकीय रचना आणि प्राप्तीचे स्रोतही त्यांनी जिल्हाधिकारी मुदगल यांच्याकडून समजून घेतले होते. तर, येथील गुन्हेगारी आणि कम्युनिटी पुलिसिंगबाबत त्यांना पोलीस आयुक्तांनी माहिती सांगितली होती. आज आपल्या देशात परत जाताना ते पुन्हा नागपूर विमानतळावर सायंकाळी ५.३० वाजता उतरले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अॅन्ना हाकोबयान, विदेश मंत्रालयाचे उपमंत्री अव्हेट अॅडोन्टस, उच्च तंत्र उद्योगमंत्री हाकोब अर्शाक्यान, अर्थमंत्री आणि पत्रकारांचे प्रतिनिधीमंडळ होते. राजशिष्टाचाराप्रमाणे जिल्हाधिकारी मुदगल यांनी पंतप्रधान पाशिनयान यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी मुदगल आणि पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी त्यांच्याशी चर्चा केली. दीड तासाच्या विश्रांतीनंतर रात्री ७ वाजता त्यांनी आपल्या प्रतिनिधी मंडळासह नागपूर विमानतळावरून मायदेशी जाण्यासाठी प्रयाण केले.