मायलेकावर सशस्त्र हल्ला
By Admin | Published: September 10, 2016 02:45 AM2016-09-10T02:45:05+5:302016-09-10T02:45:05+5:30
जुन्या वादातून चौघांनी दोन भावंडावर सशस्त्र हल्ला चढवला. मुलांना मारहाण होत असल्याचे पाहून मध्ये धावलेल्या आईलाही आरोपींनी जबर मारहाण केली.
नागपूर : जुन्या वादातून चौघांनी दोन भावंडावर सशस्त्र हल्ला चढवला. मुलांना मारहाण होत असल्याचे पाहून मध्ये धावलेल्या आईलाही आरोपींनी जबर मारहाण केली. यात आई आणि तिची दोन मुले जबर जखमी झाली. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमीचे एका महिलेसोबत असलेल्या मैत्रिपूर्ण संबंधामुळे यशोधरानगरात गुरुवारी रात्री ही घटना घडल्याचे सांगितले जाते.
राजेश दशरथ सातपुते (वय २२) हा यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संतोषनगरात राहतो. त्याचे एका महिलेशी मैत्रिपूर्ण संबंध असल्यामुळे एका आरोपीसोबत राजेश आणि त्याचा भाऊ नितीन याचा वाद होता.
या पार्श्वभूमीवर, आरोपी बबलू शिवकुमार जुटेलकर (वय ३०), मुन्ना सवकीलाल गोंडाणे (वय ३२), उमेश गोंडाणे (वय ३०) आणि अश्विन महतो (वय २२) यांनी गुरुवारी रात्री ११.२० वाजता आरोपी राजेशवर हल्ला चढवला. त्यांनी भाल्याचे पाते आणि लाठ्यांनी राजेशला मारून गंभीर जखमी केले. राजेशच्या मदतीला धावलेल्या नितीनलाही आरोपींनी बेदम मारहाण केली.
मुलांना होत असलेली मारहाण पाहून राजेशची आई मदतीसाठी धावली असता आरोपींनी तिलाही मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. राजेशच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांची चौकशी केली जात आहे. (प्रतिनिधी)