दुहेरी हत्याकांडात शस्त्र विक्रेता मन्नानची तुरुंगात रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 11:02 AM2023-08-03T11:02:02+5:302023-08-03T11:03:08+5:30
निरालाकुमार यांनी पुण्यातील बिल्डरकडून उधार घेतले होते दीड कोटी
नागपूर/कोंढाळी : पैशांच्या हव्यासातून झालेल्या कोंढाळीतील दुहेरी हत्याकांडात आरोपींना शस्त्र पुरविणारा विक्रेता अब्दुल मन्नान याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. कोंढाळी पोलिसांनी त्याला काटोल न्यायालयासमोर सादर केले व त्यानंतर त्याला कारागृहात पाठविण्यात आले.
अंबरीश गोळेे व निरालाकुमार सिंह यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी ओंकार तलमले याला या घटनेच्या १५ दिवसांअगोदर मन्नानने ५० हजार रुपयांत दोन माउजर व आठ काडतूस विकले होते. अब्दुल मन्नान हा मूळचा बिहारचा असून, नागपुरात तो गिट्टीखदान येथे राहतो. ट्रक क्लीनर असलेला मन्नान हा बिहारमधून शस्त्र आणून जिल्ह्यात गुन्हेगारांना विकतो, अशी बाब चौकशीतून समोर आली.
मुख्य आरोपी ओंकार तलमले याच्याकडे महागडी कार होती. मात्र, तो स्वत: कर्जबाजारी झाला होता. हीच रक्कम फेडण्यासाठी त्याने हा कट रचला होता. त्याने विशाल पुंजच्या माध्यमातून निरालाकुमार यांना दीड कोटी रुपयांच्या व्हाइट रकमेच्या बदल्यात दोन कोटी तीस लाख रुपये रोख देण्याचे आमिष दाखविले होते. निरालाकुमारने त्यांच्यावर विश्वास ठेवला. एका दिवसात १.३० कोटी मिळणार असल्याने त्यांनी पुण्यातील जय बिल्डर्सच्या मालकाला संपर्क केला. त्यांच्याकडून ही दीड कोटीची रक्कम आयसीआयसीआय बँक, छत्रपतीनगर नागपूर येथे पाठवून बँकेला ओंकार तलमलेच्या कंपनीच्या नावाचा डीडी बनविण्यास सांगितले. बँकेने निरालाकुमार यांच्या आधार कार्डाची झेरॉक्स घेऊन तो डीडी त्यांना दिला होता. त्यानंतरच हे हत्याकांड झाले.