‘नॉन कॉन्ट्रॅक्ट वॉर’ अप्रत्यक्ष युद्धासाठी आर्मी नेहमीच सज्ज : लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 09:06 PM2019-01-05T21:06:50+5:302019-01-05T21:12:22+5:30
‘नॉन कॉन्ट्रॅक्ट वॉर’ अप्रत्यक्ष युद्धाबाबत आम्ही नेहमीच सतर्क व सज्ज असतो. त्यासाठी आर्मीची सुरक्षेबाबतची पूर्ण तयारी आहे, असे भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत म्हणाले. भोसला मिलिटरी स्कूलचा २३ वा वार्षिक समारंभ शनिवारी कस्तूरचंद पार्कवर आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘नॉन कॉन्ट्रॅक्ट वॉर’ अप्रत्यक्ष युद्धाबाबत आम्ही नेहमीच सतर्क व सज्ज असतो. त्यासाठी आर्मीची सुरक्षेबाबतची पूर्ण तयारी आहे, असे भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत म्हणाले. भोसला मिलिटरी स्कूलचा २३ वा वार्षिक समारंभ शनिवारी कस्तूरचंद पार्कवर आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.
आज सोशल मीडियावर बरीच माहिती उपलब्ध आहे. तेव्हा सोशल मीडियाचा वापर ग्रीटिंग कार्ड, जोक किंवा चुकीची माहिती पाठवण्यासाठी न करता योग्य ज्ञान व शिक्षणासाठी करावा. स्वत:चे करिअर घडवण्यासाठी करावा, असे आवाहनही त्यांनी या समारंभात मुख्य वक्ते म्हणून केले.
या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्य अतिथी होते. राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भोसला मिलिटरी स्कूलचे प्रमुख शैलेश जोगळेकर, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी (सीएचएमईएस) नागपूर विभागाचे चेअरमन सूर्यभान डागा, सचिव कुमार काळे, शाळेचे कमांडंट कर्नल जे.एस. भंडारी, प्राचार्य अजय शिर्के, लेफ्ट.जनरल बी.बी. शेकटकर, दिलीप बेलगावकर प्रामुख्याने उपस्थित होते.
जनरल बीपिन रावत यांनी यावेळी भोसला मिलिटरी स्कूलच्या कार्याची प्रशंसा केली. ज्ञान मिळवण्यासाठी आज अनेक साधने उपलब्ध आहेत. परंतु चांगले आणि मुलांना सुसंस्कृत घडविणारे शिक्षण हे शाळेतच मिळते. त्यामुळे शाळा फार महत्त्वाची आहे. भोसला मिलिटरी शाळेच्या माध्यमातून मुलांना शिस्तप्रिय आणि दर्जेदार शिक्षण देण्यात येत आहे. मुलंही देशाचे भविष्य आहे. यांच्या खांद्यावरच उद्याच्या देशाचा विकास व प्रगती अवलंबून आहे. येथील मुलांनी सैन्यात यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०३५ पर्यंत इतर देश वयोवद्ध होणार असून भारत हा जगातील सर्वात तरुण देश असणार आहे. देश किती युवा आहे, यावर त्याचे भविष्य अवलंबून नाही तर युवकांमधील शिस्त आणि देशभक्ती यावर त्यांचे भविष्य व विकास अवलंबून आहे. देशासमोर अनेक आव्हाने आहेत. मात्र येणारा काळ हा सुवर्ण असणार आहे, असे ते म्हणाले. सैन्यापासून आम्हाला प्रेरणा, आत्मविश्वास मिळतो. सैनिकी मूल्यांचे संगोपन आणि शिस्त मुलांमध्ये रुजविण्याचे काम भोसला मिलिटरी स्कूल करीत आहे. हे फार प्रशंसनीय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
तत्पूर्वी भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी परेड केली. लष्करप्रमुख रावत यांनी परेडचे अवलोकन केले. यानंतर विद्यार्थ्यांनी एअरो मॉडेलिंग शो, जिम्नॅस्टिक, बिग जम्प, लेझिम, हॉर्स रायडिंगद्वारे उपस्थितांचे लक्ष वेधले.
उत्कर्ष राठोड बेस्ट कॅडेट
उत्कर्ष राठोडला बेस्ट कॅडेट म्हणून घोषित करण्यात आले. यावेळी त्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लष्करप्रमु रावत यांच्या हस्ते गौरवही करण्यात आला. बेस्ट भवनाचा पुरस्कार गुरु गोविंदसिंह भवन यांना देण्यात आला. तर राणाप्रताप कंपनीला चॅम्पियन ट्रॉफी देण्यात आली.
अप्रत्यक्ष युद्धासाठी आर्मी नेहमीच सज्ज
यावेळी लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्याचे टाळले, परंतु त्याच वेळी ‘नॉन कॉन्ट्रॅक्ट वॉर’ अप्रत्यक्ष युद्ध याबाबत त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, अप्रत्यक्ष युद्धाबाबत आम्ही नेहमीच सतर्क व सज्ज असतो. त्यासाठी आर्मीची सुरक्षेबाबतची पूर्ण तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.