मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी उतरविणार मंत्र्यांची फौज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:10 AM2021-08-29T04:10:20+5:302021-08-29T04:10:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापािलकेची निवडणूक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गांभीर्याने घेतली आहे. निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आपल्या मंत्र्यांची फौज मैदानात उतरविणार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापािलकेची निवडणूक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गांभीर्याने घेतली आहे. निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आपल्या मंत्र्यांची फौज मैदानात उतरविणार आहे. दर १५ दिवसांनी राष्ट्रवादीचे मंत्री नागपुरात दाखल होतील. पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. सोबतच राष्ट्रवादी आपल्या दारी उपक्रम राबवा, लोकांच्या समस्या सोडवा, जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन करा, असे निर्देश कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना देत त्यांना निवडणुकीसाठी चार्ज केले.
गणेशपेठ येथील पक्ष कार्यालयात शनिवारी आयोजित बैठकीत शहर व जिल्हा राष्ट्रवादी कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांशी सुप्रिया सुळे यांनी वेगवेगळी चर्चा केली. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतील. प्रत्येक नेत्याला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मात्र, निर्णय काय होईल याची वाट न पाहता आपली तयारी सुरू ठेवा. बूथनिहाय कमिट्या गठित करून कामाला लागा. पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक भरडले जात आहेत. राज्यातील महाविकास आघाडीने जनहिताचे महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादीचे संपर्क प्रमुख माजी आमदार राजेंद्र जैन, माजी मंत्री रमेश बंग, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, ग्रामीण अध्यक्ष शिवराज गुजर, प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ टांकसाळे, माजी आमदार विजय घोरमाडे, दीनानाथ पडोळे, वेदप्रकाश आर्य, नगरसेविका आभा पांडे, चंद्रशेखर चिखले, बंडू उमरकर, चंद्रशेखर कोल्हे, शहर महिला अध्यक्षा लक्ष्मी सावरकर, जिल्हा महिला अध्यक्षा अर्चना हरडे, संतोष नरवाडे, शोएब असद यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
...तर राष्ट्रवादी स्वबळावर लढेल : पेठे
- मनपा निवडणुकीत मागणीनुसार काँग्रेसने जागा दिल्या नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचा इशारा दुनेश्वर पेठे यांनी दिला.
...
गंगा-जमुना संवेदनशील विषय
- खा. सुळे यांना गंगा-जमुनासंदर्भात विचारणा केली असता त्या म्हणाल्या, हा विषय अतिशय संवेदनशील आहे. मी त्यावर माहिती घेईन. दाेन्ही बाजू ऐकून प्रशासनाचेही म्हणणे ऐकून घेऊ, असे स्पष्ट केले.
- कोविडकाळात नागपूर महापालिकेत भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. ती होत नसेल तर या विरोधात आंदोलन करा, असा सल्ला त्यांनी दिला.
- नागपूर मेट्रोमध्ये आरक्षण डावलून पदभरतीच्या चौकशी व्हायला काही हरकत नाही. चौकशी मागणे हा अधिकार आहे.
- विकास झाला पाहिजे. मात्र, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत शहरे स्मार्ट झालीच नाहीत, तर कन्सलटंटला मोठी रक्कम मिळाली, असा आरोप त्यांनी केला.