आर्णी ते दीक्षाभूमी : 'समतेचे महाकाव्य' साकारण्यासाठी सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 12:23 AM2020-02-01T00:23:03+5:302020-02-01T00:33:26+5:30
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारीत पाच हजार कवितांचा संग्रह ‘समतेचे महाकाव्य’ म्हणून प्रसिद्ध होणार आहे. यासाठी अकोला जिल्ह्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला असून हा पण पूर्ण करण्यासाठी आर्णी ते दीक्षाभूमी सायकल रॅली काढण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारीत पाच हजार कवितांचा संग्रह ‘समतेचे महाकाव्य’ म्हणून प्रसिद्ध होणार आहे. यासाठी अकोला जिल्ह्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला असून हा पण पूर्ण करण्यासाठी आर्णी ते दीक्षाभूमी सायकल रॅली काढण्यात आली.
आर्णीपासून २०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करीत शुक्रवारी दीक्षाभूमीवर पोहचलेल्या या बहाद्दरांनी लोकमतशी संवाद साधला. या अभियानात अकोल्याचे उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड, तहसीलदार राहुल तायडे, तहसिलदार विजय लोखंडे, उपशिक्षणाधिकारी प्रकाश अंधारे या पाच अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. हे पाचही अधिकारी २९ जानेवारीला यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथून निघाले व पुढे यवतमाळ, कळंब, देवळी, वर्धा या मार्गाने होत दीक्षाभूमीवर पोहचले. यानंतर त्याच्या मार्गाने परत जात सायकलने ४०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहेत. यामध्ये हरिओमसिंह करणसिंग बघेल, प्रमोद बुटले, दीपक हिरोळे, श्रीकृष्णा सोडगीर, सतीश पाचखंडे या पाच नागरिकांचाही समावेश आहे.
या महाकाव्यामध्ये डॉ. बाबासाहेबांचे जीवनकार्यावर कवितांचा समावेश असणार आहे. बाबासाहेबांचे बालपण, शिक्षण, त्यांनी केलेला संघर्ष, सुरू केलेली वृत्तपत्र, संस्था, पक्ष, महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह, विधिमंडळातील कार्य, संविधान निर्मितीचे कार्य, महिलांकरिता, मजुरांसाठी, विद्यार्थ्यांसाठी केलेले कार्य, राजकीय कार्य आणि बाबासाहेबांचे ग्रंथप्रेम आदी विषयांचा उलगडा महाकाव्यातील कवितांच्या माध्यमातून होणार आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभरातील आणि जगभरातील मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमधील कविता या महाकाव्यात समाविष्ट करण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी सांगितले. कवी किंवा कवयित्री एकापेक्षा अधिक कविता पाठवू शकतात. जगातील जास्तीत जास्त कविंनी डॉ. बाबासाहेबांच्या विविध पैलुवर प्रकाश टाकणाऱ्या विविध भाषांमधील कविता पाठवाव्या, असे आवाहन या सायकल रॅलीच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.