कोराडीत चोख व्यवस्था ठेवा
By admin | Published: September 25, 2015 03:46 AM2015-09-25T03:46:01+5:302015-09-25T03:46:01+5:30
कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान नवरात्र यात्रा महोत्सवाला १३ तारखेपासून सुरुवात होत असून यंदा २० लाख भाविक येतील, अशी अपेक्षा आहे.
पालकमंत्र्यांचे निर्देश : बचत भवनात घेतला आढावा
नागपूर : कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान नवरात्र यात्रा महोत्सवाला १३ तारखेपासून सुरुवात होत असून यंदा २० लाख भाविक येतील, अशी अपेक्षा आहे. तेव्हा येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी व त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी आतापासूनच नियोजन करावे, अशी सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत सभागृहात गुरुवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस नासुप्रचे सभापती श्याम वर्धने, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, सहपोलीस आयुक्त राज वर्धन, उपजिल्हाधिकारी प्रकाश पाटील व पोलीस उपआयुक्त संजय लाटकर, रामटेकचे उपविभागीय अधिकारी राम जोशी, महालक्ष्मी जगदंबा संस्थानचे पदाधिकारी व विविध खातेप्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नवरात्र महोत्सवात भरणाऱ्या यात्रेचा आढावा घेतांना म्हणाले की, या यात्रेसाठी ग्रामीण व शहरी भागातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. त्यांच्यासाठी आरोग्य, पिण्याचे पाणी, वीज, चांगले रस्ते, वाहन स्थळ, सी.सी.टीव्ही कॅमेरे, सुरक्षा तसेच सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण काढणे अशा अनेक समस्यांबाबत चर्चा करून संबंधित विभागांनी याबाबत गांभीर्याने लक्ष घालावे, अशा सूचना दिल्या.
तसेच यात्रा कालावधीत वाहन स्थळाची व्यवस्था करतांना भाविकांना अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. यात्रा कालावधीत वीज खंडित होणार नाही याची दक्षता विद्युत विभागाने घ्यावी व तसेच पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटरची व्यवस्था करून ठेवावी. तसेच पोलीस विभागाने मंदिर परिसरातील १०० मीटरच्या आत कोणतीही वाहने सोडू नयेत व अत्यावश्यक सेवेसाठी संबंधित विभागाने आपापल्या वाहनांसाठी पासेसची व्यवस्था करावी.(प्रतिनिधी)