'टोल बूथ'वर स्थलांतरितांच्या अन्नपाण्याची सोय करा : नितीन गडकरींचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 08:38 PM2020-03-28T20:38:36+5:302020-03-28T20:40:19+5:30
देशभरात ‘लॉकडाऊन’मुळे हाती काम नसल्याने विविध ठिकाणी मजूर व कामगार मूळ गावी स्थलांतर करत असल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत या लोकांच्या पोटापाण्याची ‘टोल बूथ’वर सोय होऊ शकते. यासंदर्भात पुढाकार घ्यावा असा सल्ला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशभरात ‘लॉकडाऊन’मुळे हाती काम नसल्याने विविध ठिकाणी मजूर व कामगार मूळ गावी स्थलांतर करत असल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत या लोकांच्या पोटापाण्याची ‘टोल बूथ’वर सोय होऊ शकते. यासंदर्भात पुढाकार घ्यावा असा सल्ला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. ‘एनएचएआय’च्या (नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया) अध्यक्षांना त्यांनी हा सल्ला दिला आहे. सोबतच ‘टोल ऑपरेटर्स’लादेखील आवाहन केले आहे.
‘लॉकडाऊन’मुळे सर्वच शहरांतील कामे, आस्थापना बंद आहेत. कामानिमित्त दुसऱ्या जिल्ह्यांतून किंवा राज्यातून मोठ्या शहरांत मोठ्या प्रमाणात मजूर व कामगार आले होते. हातावर पोट असलेल्यांची कमाईच बंद आहे. त्यामुळे खाण्यापिण्याची आबाळ होत आहे. शिवाय ‘कोरोना’चादेखील धोका आहे. त्यामुळेच बरेच जण गावांकडे परतताना दिसून येत आहेत.
गावांकडे स्थलांतरित होणारे मजूर-कामगार यांची ‘टोल बूथ’वर खाण्यापिण्याची सोय होऊ शकते. शिवाय त्यांच्या आरोग्यासंबंधीदेखील सुविधा निर्माण केली जाऊ शकते, अशी सूचना गडकरी यांनी ‘एनएचएआय’च्या अध्यक्षांना केली आहे. ही संकटाची स्थिती आहे. अशा काळात ‘टोल बूथ ऑपरेटर्स’देखील या आवाहनाला प्रतिसाद देतील व देशबांधवांसाठी आवश्यक त्या सुविधा प्रदान करतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे.