टोल नाक्यांवर मजुरांच्या भोजनाची व्यवस्था ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:07 AM2021-03-24T04:07:42+5:302021-03-24T04:07:42+5:30
नागपूर : कोरोनाचे वाढते संक्रमण आणि लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अनेक मार्गांवर बसेस बऱ्याच कमी धावत आहेत. मध्य प्रदेश आणि ...
नागपूर : कोरोनाचे वाढते संक्रमण आणि लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अनेक मार्गांवर बसेस बऱ्याच कमी धावत आहेत. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसाठी जाणाऱ्या बसेस तर सध्या बंदच झाल्यासारख्या आहेत. याच दरम्यान आलेल्या होळीच्या सणासाठी मजूरवर्ग आपल्या गावाकडे परतत आहे. अशा काळात कुणी मजूर पायदळ गावाकडे जाताना दिसत असेल तर, त्याला टोल नाक्यावर अन्नपाणी आणि टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) अधिकाऱ्यांनी टोल नाका संचालकांना दिले आहेत.
मागील लॉकडाऊनच्या काळामध्ये वाहतुकीच्या साधनाअभावी लाखो मजूर शेकडो किलोमीटर अंतर कापून गावाकडे परतले होते. उपाशापोटी दूरवरचा प्रवास केल्याने अनेकांच्या पायांना जखमाही झाल्या होत्या. अनेकांची प्रकृती वाटेतच बिघडली होती. अनेक मजूर राज्यांच्या सीमावर्ती भागांमध्ये अडकले होते, तर अनेकांनी टोल नाक्यावर आश्रय घेतला होता, हे उल्लेखनीय! ही परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ही भूमिका घेतली आहे.