आधी गणवेषाची व्यवस्था करा, नंतरच कारवाई करा : एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष
By नरेश डोंगरे | Published: February 6, 2024 10:06 PM2024-02-06T22:06:32+5:302024-02-06T22:06:46+5:30
लोकमत इम्पॅक्ट : महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अधिकाऱ्यांना निवेदन
नागपूर : गणवेषाची व्यवस्था केली नसताना कर्मचाऱ्यांना गणवेष सक्ती करण्याचा आदेश तुघलकी आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष असून, तो लक्षात घेता आधी कर्मचाऱ्यांना गणवेषाचा कपडा उपलब्ध करून द्या, नंतरच कारवाईच्या आदेशाची अंमलबजावणी करा, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने एसटीच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.
एसटी कडून प्रत्येक कर्मचाऱ्याला दरवर्षी नियमितपणे गणवेषासाठी कपडा दिला जातो. आपल्या साईजनुसार, कर्मचाऱ्यांनी त्यांचा गणवेष शिवून घ्यायचा आणि शिस्तीचा भाग म्हणून गणवेष घालूनच कर्तव्यावर यायचे, असा उद्देश यामागे आहे. मात्र, नागपूर विभागातील कर्मचाऱ्यांना गेल्या चार वर्षांपासून गणवेशाचा कपडाच एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिलेला नाही. असे असताना कर्मचाऱ्यांसाठी एक आदेश एसटीच्या अधिकाऱ्यांनी काढला आहे. त्यानुसार, १ फेेब्रुवारीपासून एसटीतील चालक-वाहकासह इतर कर्मचाऱ्यांनी ड्यूटीवर असताना गणवेशातच असले पाहिजे. त्यांच्या खिशाला नेमप्लेट आणि चालक-वाहकांना बिल्लाही असला पाहिजे, असे त्यात नमूद आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर १ फेब्रुवारीपासून कारवाई करण्याचा ईशाराही देण्यात आला आहे. यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. या संबंधाने लोकमतने ४ फेब्रुवारीच्या अंकात ठळकपणे वृत्त प्रकाशित केले होते.
या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे उपाध्यक्ष अजय हट्टेवार यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने एसटीचे विभागीय उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. कर्मचाऱ्यांना गेल्या चार वर्षांपासून गणवेशाचे कापड न देता त्यांना गणवेषाची सक्ती करणे आणि कारवाईचा ईशारा देणे न्यायसंगत नसल्याचे या निवेदनातून संघटनेने म्हटले आहे.
कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही
हा आदेश काढण्यात आला असला तरी कोणत्याही कर्मचाऱ्यांवर हेतूपुरस्सर कारवाई होणार नाही किंवा कुणावरही अन्याय केला जाणार नसल्याचे उपमहाव्यवस्थापक गभणे यांनी आश्वासन दिल्याचे हट्टेवार यांनी सांगितले आहे.