समता सैनिक दलाने सांभाळली दीक्षाभूमीची व्यवस्था
By admin | Published: October 24, 2015 03:14 AM2015-10-24T03:14:14+5:302015-10-24T03:14:14+5:30
जी समता सैनिक दलाची सेना बाबासाहेबांच्या सुरक्षेकरिता झटत होती, तीच सेना आजही दीक्षाभूमीच्या व्यवस्थेसाठी तेवढ्याच प्रेरणेने झटताना दिसून आली.
नागपूर : जी समता सैनिक दलाची सेना बाबासाहेबांच्या सुरक्षेकरिता झटत होती, तीच सेना आजही दीक्षाभूमीच्या व्यवस्थेसाठी तेवढ्याच प्रेरणेने झटताना दिसून आली. दीक्षाभूमीच्या संपूर्ण व्यवस्थेत व कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांच्या दिमतीला देशभरातून आलेले १५ हजारावर दलाचे सैनिक नि:स्वार्थपणे सेवा देत होते.
देशाच्या कानाकोपऱ्यातून दीक्षाभूमीवर आलेला जनसागर, हातात निळे झेंडे आणि मुखातून होणारा बाबासाहेबांचा गजर एक उत्साह भीम बांधवांमध्ये ओसंडून वाहत होता. या उत्सवात कुठलीही विपरित घटना घडू नये, दीक्षाभूमीवर येणाऱ्या प्रत्येकजण अतिशय सुरक्षितपणे परत जावा, यासाठी डोळ्यात तेल घालून, दीक्षाभूमीच्या सुरक्षेत तैनात होते. निळी टोपी, पांढरा शर्ट, खॉकी पॅण्ट आणि हातात काठी हा गणेवशधारी सैनिक दीक्षाभूमी परिसरात प्रत्येक ठिकाणी आपली जबाबदारी निभावत होता. यासाठी छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू येथूनही हे सैनिक सेवा देण्यासाठी आले होते. दीक्षाभूमीच्या सुरक्षेबरोबरच असामाजिक तत्त्वांवर नियंत्रण, शिस्तीत लोकांना स्तूपापर्यंत घेऊन जाण्याचे काम, लोकांना सहकार्य, गर्दी निवळण्याचे काम, हरविलेल्यांना सहयोग स्थळी घेऊन जाण्याचे काम, तर कुठे भोजनासाठी लागलेल्या रांगामध्ये शिस्तीत लावताना दलाचे जवान दिसून आले.
बाबासाहेबांनी आमच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे
बाबासाहेबांची चळवळ आम्ही रुजवित आहोत. गावागावात समता सैनिक दलाच्या माध्यमातून युवक व तरुणांना जोडत आहोत. त्याचबरोबर दीक्षाभूमीवर आम्ही सुरक्षा देण्याबरोबरच व्यसन करणाऱ्या युवकांना मार्गदर्शन करून व्यसनापासून सोडवित आहोत.
-प्रा. सचिन गजभिये, समता सैनिक दलाचे सैनिक
रिपब्लिकन चळवळीसाठी दल महत्त्वाचे
मागासलेल्या समाजाला बाबासाहेबांचे विचार मोलाचे वाटत आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने गावच्या गाव समता सैनिक दलाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या चळवळीशी जुळत आहे.
-आनंद रामटेके, कमांडो, समता सैनिक दल