गणपती विसर्जनासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त

By admin | Published: September 27, 2015 02:52 AM2015-09-27T02:52:00+5:302015-09-27T02:52:00+5:30

जिल्ह्यात सर्वत्र पारंपरिक गणपती उत्सवाची धूम सुरू आहे.

Arrangement of police for immersing Ganapati | गणपती विसर्जनासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त

गणपती विसर्जनासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त

Next

कामठीत रोडमार्च : संशयितांवर ठेवणार करडी नजर
नागपूर : जिल्ह्यात सर्वत्र पारंपरिक गणपती उत्सवाची धूम सुरू आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३०६ सार्वजनिक गणेशमूर्ती आणि ७२८४ घरगुती गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. रविवारी २३७ व सोमवारी ५९ असे एकूण २९६ मूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. याच धर्तीवर सुरक्षेच्या दृष्टीने ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. गणपती विसर्जनादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता नागरिकांनी तसेच गणेश उत्सव मंडळानी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी केले आहे.
नागपूर जिल्ह्यात विशेषत: कामठी शहरात गणपती विसर्जनाकरिता मोठ्या प्रमाणात शोभायात्रा व मिरवणुकीचे आयोजन केले जाते. पोलीस स्टेशन कामठी अंतर्गत शहरात १०७ व ग्रामीण भागात ११ असे एकूण ११८ सार्वजनिक गणपतीची स्थापना करण्यात आली असून अंदाजे ३५३४ घरगुती गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. रविवारी व सोमवारी भाविक आपल्या लाडक्या गणरायांना निरोप देणार आहेत.
याकरिता महादेव घाट, कन्हान नदी कामठी येथे पोलीस बंदोबस्तासाठी दोन पोलीस उपअधीक्षक, सात पोलीस निरीक्षक, २० सहायक पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक, २२३ पोलीस कर्मचारी तसेच आयटीबीपीचे दोन सेक्शन तसेच संपूर्ण पोलीस स्टेशन अंतर्गत ३८ गृहरक्षक दल नेमण्यात आले आहेत. सर्व उपविभागीय अधिकारी हे स्ट्रायकिंग फोर्स तयार करून आपापल्या हद्दीत डीआरटी पथक वाहनासह पेट्रोलिंग करतील. पोलीस स्टेशन जुनी कामठी व कामठी अंतर्गत गणपती विसर्जन बंदोबस्ताचा सराव म्हणून शनिवारी शहरात रोडमार्च करण्यात आला. यात ३५ पोलीस अधिकारी, ३५० पोलीस कर्मचारी, एक आरसीपी पथक, एक आयटीबीपी पथक तसेच गृहरक्षक दलाच्या जवानांचा सहभाग होता.
गणेश विसर्जनादरम्यान घातपात कृत्य टाळण्यासाठी कुठल्याही वस्तूला हात लावू नये, त्याबाबत तत्काळ पोलिसांना सूचना द्यावी. बंदोबस्तादरम्यान साध्या गणवेशातील विशेष पोलीस पथके सर्वत्र तैनात राहणार असून संशयितांच्या हालचालीवर करडी नजर ठेवून असतील, असेही डॉ. सिंह यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Arrangement of police for immersing Ganapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.