सैनिकाचा खून करणाऱ्यास अटक

By admin | Published: May 13, 2016 03:22 AM2016-05-13T03:22:22+5:302016-05-13T03:22:22+5:30

रजेवर आलेल्या सैनिकाचा जुन्या वैमनस्यातून खून करणाऱ्या तसेच नरखेड पोलिसांना घरफोडी, दरोडा, विनयभंग यासारख्या गंभीर गुन्ह्यात ...

The arrest of the soldier's murderer | सैनिकाचा खून करणाऱ्यास अटक

सैनिकाचा खून करणाऱ्यास अटक

Next

तीन वर्षानंतर पोलिसांना यश : स्थानिक गुन्हे शाखेची पारडसिंगा परिसरात कारवाई
काटोल : रजेवर आलेल्या सैनिकाचा जुन्या वैमनस्यातून खून करणाऱ्या तसेच नरखेड पोलिसांना घरफोडी, दरोडा, विनयभंग यासारख्या गंभीर गुन्ह्यात हव्या असलेल्या अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी सायंकाळी काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारडसिंगा येथील सती अनसूया माता मंदिराच्या परिसरात मोठ्या शिताफीने अटक केली. त्याने सैनिकाची हत्या मध्य प्रदेशातील पांढुर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत केली होती. विशेष म्हणजे, पोलीस गेल्या तीन वर्षांपासून सदर आरोपीचा शोध घेत होते. त्याला अटक करण्यात तीन वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.
हेमराज गजानन बाभूळकर (२७, रा. तीनखेडा, ता. नरखेड) असे अटक करण्यात आलेल्या अट्टल आरोपीचे तर नंदन सुभाषराव नासरे, रा. नागपूर असे मृत सैनिकाचे नाव आहे. नंदन हा भारतीय सैन्यदलात पंजाबातील भटिंडा येथे सैनिक म्हणून कार्यरत होता. तो नोव्हेंबर २०१३ मध्ये रजेवर नागपुरात आला होता. नंदन आणि हेमराज यांच्यात काहीतरी कारणावरून वाद निर्माण झाला होता. पुढे दोघांमधील वैमनस्य वाढत गेले. सैन्यदलात नोकरी मिळाल्यानंतर नंदन हा वाद विसरला होता. दुसरीकडे, हेमराजने नंदनला संपविण्याचा कट रचला होता.
दरम्यान, नंदन हा रजेवर आल्याची माहिती हेमराजला मिळाली होती. नंदन हा २२ नोव्हेंबर २०१३ रोजी नरखेड परिसरात आल्याचे कळताच हेमराजने त्याला गाठले आणि त्याला महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमावर्ती भागातील पांढुर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेले आणि तिथे त्याची हत्या केली. यावेळी हेमराजसोबत त्याचा काटोल येथील मित्र आणि इतर साथीदार होते. ते सर्व या हत्येच्या प्रकरणात सहभागी होते. घटनेनंतर हेमराजसह त्याचे साथीदार वेगवेगळ्या ठिकाणी पळून गेले होते. परिणामी, पांढुर्णा पोलिसांनी त्यावेळी नंदनच्या हत्येप्रकरणी भादंवि ३०२, २०१, १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यातच पांढुर्णा पोलिसांनी हेमराजच्या काटोल येथील मित्राला अटकदेखील केली होती.
मध्यंतरी हेमराज हा नरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरत होता. त्यातच त्याने एका महिलेचे अपहरण करून तिचा विनयभंग केला. सदर महिलेने कशीतरी स्वत:ची सुटका करवून पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदविली. ही घटना वर्षभरापूर्वी घडली. त्यामुळे नरखेड पोलीस ठाण्यात हेमराजविरुद्ध भादंवि ३५४, ३६६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. हेमराज हा अट्टल गुन्हेगार असल्याचे स्पष्ट होताच नागपूर ग्रामीण पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हेमराजच्या मागावर होते.
तो सोमवारी (दि. ९) काटोल तालुक्यातील पारडसिंगा येथील सामूहिक विवाह सोहळ्याला आल्याचे कळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला आणि त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेत अटक केली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अनंत रोकडे, अप्पर पोलीस अधीक्षक नरसिंग शेरखाने यांच्या मार्गदर्शनात सतीश गोवेकर, सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, उल्हास भुसारी, अजबसिंह जारवाल, सहायक फौजदार रमेश चहारे, पोलीस हवालदार राजेंद्र सनोडिया, प्रमोद बन्सोड, मदन आसतकर, सूरज परमार, मायकल डेनियल, पोलीस शिपाई शैलेश यादव, अमोल नागरे, राधेश्याम कांबळे, शैलेश बनोदे, भाऊराव खंडाते आदींनी यशस्वीपणे बजावली. (तालुका प्रतिनिधी)

पोलिसांवर हल्ला
हेमराज खून प्रकरणात पांढुर्णा पोलिसांना तसेच नरखेड पोलिसांनी दरोडा, घरफोडी व विनयभंगाच्या गुन्ह्यात हवा असल्याने नागपूर ग्रामीण पोलीस त्याच्या मागावर होते. गावात दहशतीमुळे त्याच्याबाबत कुणीही माहिती देण्यास तयार नव्हते. तो काही महिन्यांपूर्वी त्याच्या मूळ गावी अर्थात तीनखेडा येथे त्याच्या घरी आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याला पकडण्यासाठी तीनखेडा येथे पोहचते न पोहचते तोच पोलीस आल्याची कुणकुण हेमराजला लागली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याच्या घरी पोहचताच त्याने पोलिसांनी हल्ला चढविला आणि तीनखेडा येथून पळ काढला. यावेळी हेमराज पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. परिणामी, त्याला अटक करण्याची पोलिसांची ही संधी हुकली होती.

विवाह सोहळा अन् सापळा
हेमराज हा अट्टल गुन्हेगार असल्याचे स्पष्ट होताच पोलीस अधीक्षक अनंत रोकडे यांनी त्याला पकडण्याची विशेष जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर, सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर व उल्हास भुसारी यांच्यावर सोपविली होती. हेमराज हा पारडसिंगा येथील सामूहिक विवाह सोहळ्याला आल्याची तसेच तोच पारडसिंग्याहून तीनखेडा येथे परत जाणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सामूहिक विवाह सोहळास्थळी सापळा रचला. त्या ठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. तो विवाह सोहळ्यातून तीनखेडा येथे घरी परत जात असतानाच त्याला ताब्यात घेत अटक केली.

Web Title: The arrest of the soldier's murderer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.