नागपुरात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 01:00 AM2018-10-18T01:00:52+5:302018-10-18T01:01:40+5:30
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेने बुधवारी सकाळी अटक करून त्याच्या जवळून १२२० रुपये किमतीची तात्काळची तिकीटे जप्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेतिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेने बुधवारी सकाळी अटक करून त्याच्या जवळून १२२० रुपये किमतीची तात्काळची तिकीटे जप्त केली.
अशफाक खान शमीम खान (३२) रा. बंगाली पंजा असे अटक करण्यात आलेल्या दलालाचे नाव आहे. सणासुदीचे दिवस असल्यामुळे नागपुरातून चारही दिशांना जाणाऱ्या रेल्वेगाड्यात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना कन्फर्म तिकीट पाहिजे असते. प्रवाशांच्या या मानसिकतेचा फायदा घेऊन त्यांच्याकडून २०० ते ३०० रुपये अधिक घेऊन दलाल त्यांना तिकिटांची विक्री करतात. रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेने बुधवारी सकाळी नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्व गेटकडील संत्रा मार्केट आरक्षण कार्यालयात धाड टाकली. यावेळी अशफाक खान हा आरक्षणाचे तात्काळ तिकीट काढताना दिसला. पथकातील सदस्यांनी त्याची चौकशी केली असता त्याने घाबरून तात्काळचे तिकीट काढून गरजु प्रवाशांना देत असल्याची कबुली दिली. यासाठी प्रवाशांकडून तिकिटाच्या किंमतीपेक्षा २०० ते ३०० रुपये अधिक घेत असल्याचे त्याने सांगितले. त्याच्या जवळ आरक्षणाची १२०० रुपये किमतीची तिकिटे आढळली. आरोपीला आरपीएफचे उपनिरीक्षक शिवराम सिंह यांच्या समोर हजर केले. दोन पंचासमक्ष जप्ती पंचनामा करून करून त्याच्या जवळील तिकिटे जप्त करण्यात आली. ही कारवाई आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शिवराम सिंह, विजय पाटील, किशोर चौधरी यांनी पार पाडली.