नागपुरातील हत्या प्रकरणातील आरोपी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 11:56 PM2020-06-05T23:56:19+5:302020-06-06T00:05:11+5:30
: प्रतापनगर आणि हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन्ही हत्यांच्या गुन्ह्याचा छडा पोलिसांनी लावला आहे. प्रतापनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांचा ९ जूनपर्यंत पीसीआर मिळवण्यात आला आहे. तर हुडकेश्वर पोलिसांनी चारपैकी तीन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रतापनगर आणि हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन्ही हत्यांच्या गुन्ह्याचा छडा पोलिसांनी लावला आहे.
प्रतापनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांचा ९ जूनपर्यंत पीसीआर मिळवण्यात आला आहे. तर हुडकेश्वर पोलिसांनी चारपैकी तीन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवारी दुपारी २ ते २.३० च्या सुमारास आरोपी विक्रम हुकुमबहादुर कार्की आणि त्याचा साथीदार रामू बहादुर गोमासे यांनी कार्तिक लक्ष्मण सारवे (वय ३५, रा. गोपाल नगर) याची भीषण हत्या केली होती. पोलिसांनी सहा तासात दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी तसेच लोखंडी रॉड जप्त केला. आज या दोघांना न्यायालयात हजर करून त्यांचा ९ जूनपर्यंत पीसीआर मिळवला.
आतापर्यंतच्या पोलीस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार आरोपी विक्रम याच्या विवाहित बहिणीसोबत मृत कार्तिक सारवे याचे अनैतिक संबंध होते. या संबंधामुळे बदनामी होत असल्यामुळे आरोपीने कार्तिक याला तिच्याशी संबंध तोडून टाकण्यासाठी अनेकदा बजावले होते. मात्र तो ऐकत नसल्यामुळे अखेर विक्रमने साथीदाराच्या मदतीने कार्तिक सारवेची हत्या केली.
हुडकेश्वरमध्ये वैभव सुरेश मुरते (३४) याची आरोपी कुणाल बच्छेरे याने त्याच्या तीन साथीदारांसह गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास धारदार शस्त्राचे घाव घालून हत्या केली होती.
या घटनेला अवैध सावकारीतून निर्माण झालेला वाद कारणीभूत असल्याचे पुढे आले आहे. मृत वैभव हा अवैध सावकारी करीत होता. आरोपी कुणाल बछेरे याने वैभवकडून ८० हजार रुपये व्याजाने घेतले होते. कुणालने गेल्या तीन महिन्यांपासून व्याजाचा एकही रुपया वैभवला दिला नव्हता. त्यामुळे वैभव आणि कुणालच्या संबंधात तेढ निर्माण झाले होते. मुद्दल नाही तर व्याजाची तरी रक्कम मिळावी म्हणून वैभव कुणालला सारख्या शिव्या द्यायचा. चारचौघात अपमान करायचा आणि धमक्याही द्यायचा. त्यामुळे कुणाल प्रचंड चिडून होता. यातूनच त्याने वैभवच्या हत्येचा कट रचला. कुणालने रितिक मांझी, गोपाळ त्रिवेदी तसेच निरंजन साळवेला सोबत घेऊन वैभवची भीषण हत्या केली.
अटक केल्यानंतर आरोपी कुणालने हुडकेश्वर पोलिसांना सांगितल्यानुसार, वैभव त्याला पैशासाठी प्रचंड त्रास देत होता चारचौघात अपमान करत होता, तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. दारूच्या नशेत असलेल्या मित्रांना त्याने दोन दिवसांपूर्वी ही बाब सांगितली. तो आपल्याला ठार मारणार आहे, असे सांगितल्यामुळे आरोपी रितिक, गोपाळ आणि निरंजन याने 'तू कशाला मरतो, त्याचेच काम करू' असे म्हटले. त्यामुळे चौघांनी संगणमत करून वैभवला गुरुवारी सायंकाळी निर्घृणपणे ठार मारले. या प्रकरणात आरोपी निरंजन वगळता अन्य तिघांना अटक केली असून, निरंजनचा शोध घेतला जात आहे.