नाेकरीचे आमिष दाखवून महिलांना फसविणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:08 AM2021-07-21T04:08:27+5:302021-07-21T04:08:27+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : बेराेजगारी व महिलांच्या अगतिकतेचा फायदा घेत माेठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराची नाेकरी मिळवून देण्याची बतावणी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : बेराेजगारी व महिलांच्या अगतिकतेचा फायदा घेत माेठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराची नाेकरी मिळवून देण्याची बतावणी करीत फसवणूक करणाऱ्यास कामठी (नवीन) पाेलिसांनी अटक केली. ताे अवैध वसुली करीत असल्याची माहितीही पाेलिसांनी दिली.
राकेश दसराम डोंगरे (४२, रा. मेकोसाबाग कॉलनी, जरीपटका, नागपूर) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. त्याने जनहित मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था, जरीपटका, नागपूरच्या माध्यमातून २५ एजंटची नियुक्ती केली हाेती. सरकारच्या आत्मनिर्भर योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना संस्थेतर्फे सहा महिन्याने दोन हजार रुपयाचे मानधन मिळेल. शिक्षित तरुणांना माेठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराची नाेकरी मिळवून देऊ, अशी ताे बतावणी करायचा. इच्छुक व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांच्याकडून अर्ज भरून घेत प्रत्येकी ५० ते २०० रुपयापर्यंतची रक्कम देणगी म्हणून स्वीकारायचा.
त्याने संस्थेकडून पहिल्या महिन्यात सात हजार रुपये, दुसऱ्या महिन्यात १२ हजार रुपये आणि तीन महिने पूर्ण झाल्यानंतर २१ हजार रुपये दरमहा पगार मिळणार असल्याची बतावणी करीत एजंटची नियुक्ती केली हाेती. शिवाय, संस्थेत नवीन एजंट नियुक्त केले. प्रत्येकी ४०० रुपये अतिरिक्त मिळणार असल्याचेही ताे सांगायचा. त्याने व त्याच्या एजंटने काही नागरिकांकडून त्यांच्या घरी जाऊन अर्ज भरून घेतले. त्यामुळे प्रकरण पाेलिसात गेले. पाेलिसांनी त्याला ताब्यात घेत कसून चाैकशी केली, तेव्हा संपूर्ण प्रकार उघड झाला. याप्रकरणी कामठी नवीन पाेलिसांनी भादंवि ४२० अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे करीत आहेत.
....
गुरुवारपर्यंत पाेलीस काेठडी
पाेलिसांनी राकेशला कामठी येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले हाेते. न्यायालयाने त्याला तीन दिवसाची अर्थात गुरुवार (दि. २२) पाेलीस काेठडी सुनावली आहे, अशी माहिती ठाणेदार विजय मालचे यांनी दिली. त्याच्याकडून जनहित मागासवर्गीय बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे फॉर्म, पावतीबुक व एक हजार रुपये राेख, ओळखपत्र असे एकूण ४० हजार रुपयांचे साहित्य जप्त केल्याचेही विजय मालचे यांनी सांगितले.