वनविभागाच्या तारेच्या कुंपणाचे लोखंडी ॲंगल चोरणारा अटकेत
By योगेश पांडे | Published: August 25, 2023 06:11 PM2023-08-25T18:11:56+5:302023-08-25T18:12:08+5:30
गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकची कामगिरी
नागपूर : वनविभागाच्या जागेवर तारेचे कुंपण करण्यासाठी वापरण्यात येणारे लोखंडी ॲंगल चोरणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकने ही कामगिरी केली.
प्रकाश कालू चव्हाण (२८, हिंगणा) यांना बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऑक्सीजन पार्क वाहतूक पोलीस चौकीच्या मागे वर्धा मार्गा ते जबलपूर मार्गाच्या रस्त्यालगतचे वनविभागाच्या तारेच्या कुंपणाचे काम मिळाले होते. २१ जुलै रोजी त्यांनी तेथे कुंपणासाठी २१३ लोखंडी ॲंगल लावले. मात्र रात्रीच्या सुमारास त्यातील सुमारे ४५ हजारांचे ६० ॲंगल अज्ञात चोरट्याने चोरून नेले.
चव्हाण यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाला खबऱ्यांच्या माध्यमातून माहिती मिळाली की यात प्रतिक उर्फ गोलू रामनरेश पटेल (२२, श्रमिकनगर झोपडपट्टी) हा सहभागी आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने दोन मित्रांसह गुन्हा केल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्याला बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. पोलीस निरीक्षक सुहास चौधरी, प्रवीण महामुनी, बबन राऊत, सुनित गुजर, नितीन वासनिक, विनोद देशमुख, मनोज टेकाम, सुशांत सोळंके, हेमंत लोणारे, योगेश सातपुते, चंद्रशेखर भारती यांच्या पथकाने ही कारवाई केली.