बनावट ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ तयार करणाराच अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:09 AM2021-05-19T04:09:38+5:302021-05-19T04:09:38+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क माैदा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माैदा शहरात केलेल्या कारवाईमध्ये बनावट ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ तयार करून नागरिकांना ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माैदा शहरात केलेल्या कारवाईमध्ये बनावट ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ तयार करून नागरिकांना लुबाडणाऱ्यास अटक केली. त्याच्याकडून ६५ हजार ४० रुपये किमतीचे विविध साहित्य जप्त केले. ही कारवाई साेमवारी (दि. १७) दुपारी करण्यात आली.
नवाब जमीर बेग (५०, रा. ओमसाई नगर, माैदा) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. त्याचा माैदा शहरात नवाब फाेटाे स्टुडिओ आहे. माैदा शहरातील एक व्यक्ती अवघ्या १५ मिनिटात ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ तयार करून देत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील पाेलीस अधिकाऱ्यांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलीस अधिकाऱ्यांनी याचा शाेध घेत त्याच्या स्टुडिओत ग्राहकाला पाठवून याची शहानिशा केली. माहितीत सत्यता असल्याचे लक्षात येताच पथकाने लगेच त्याच्या स्टुडिओत धाड टाकून त्याला ताब्यात घेतले.
त्याने सुरुवातीला असंबद्ध उत्तरे दिली. मात्र, पाेलिसांना त्याच्या स्टुडिओत वेगवेगळ्या नावांची ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ आढळून आली असून, ती सर्व बनावट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पाेलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्याकडून ६५ हजार ४० रुपये किमतीचे विविध साहित्य जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस उपनिरीक्षक सचिन मत्ते व नरेंद्र गाैरखेडे, सहायक फाैजदार लक्ष्मीप्रसाद दुबे, साहेबराव बहाळे, हवालदार विनाेद काळे, शैलेश यादव, सत्यशील काठाेरे, अरविंद भगत, प्रणय बनाफर, अमित कराड यांच्या पथकाने केली.
....
संबंधितांनी पाेलिसांशी संपर्क साधावा
नबाव जमीर बेग याने यापूर्वी अनेकांकडून चार ते पाच हजार रुपये तसेच आधार कार्ड व फाेटाे घेऊन त्यांची ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ तयार करून दिली आहेत. ज्यांनी याच्याकडून ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ तयार करून घेतली आहेत, त्यांनी माैदा पाेलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी केले आहे.