नागपूर महापालिका आयुक्तांच्या नावाने चुकीची फेसबुक पोस्ट टाकणारे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 10:08 PM2020-04-28T22:08:30+5:302020-04-28T22:08:57+5:30

महापालिका आयुक्तांच्या नावाने जनतेची दिशाभूल करणारी फेसबुक पोस्ट अपलोड करून अफवा पसरविणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली.

Arrested for posting wrong Facebook post in the name of Nagpur Municipal Commissioner | नागपूर महापालिका आयुक्तांच्या नावाने चुकीची फेसबुक पोस्ट टाकणारे जेरबंद

नागपूर महापालिका आयुक्तांच्या नावाने चुकीची फेसबुक पोस्ट टाकणारे जेरबंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका आयुक्तांच्या नावाने जनतेची दिशाभूल करणारी फेसबुक पोस्ट अपलोड करून अफवा पसरविणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली. आदित्य मुकेश तराळे (वय २०, रा. राकेश ले-आऊट,बेलतरोडी) आणि राहुल बुद्धरत्न ताकसांडे (वय २१, रा. नाईकनगर, मानेवाडा) अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही विद्यार्थी आहेत. त्यापैकी तराळे बीई कॉम्प्युटर सायन्सच्या चौथ्या वर्षाला शिकतो तर ताकसांडे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षाला शिकत आहे.
सदर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एलआयटी मेम्स नागपूर या फेसबुक पेजवर २४ एप्रिलला एक पोस्ट अपलोड करण्यात आली. नाग नदीचे पाणी शुद्ध झाले असून आता ते पिण्यासाठी उद्यापासून वापरण्यात येणार आहे, असा मजकूर या पोस्टमध्ये होता. त्याखाली तुकाराम मुंढे, महापालिका आयुक्त, नागपूर असे लिहून होते. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली. नागरिकांमध्येही संभ्रम निर्माण झाला. या अफवेमुळे सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले. ते लक्षात घेऊन महापालिकेच्यावतीने सदर पोलीस ठाण्यात २५ एप्रिलला तक्रार नोंदविण्यात आली. ठाणेदार महेश बनसोडे यांनी गुन्हा दाखल करून प्रकरण सायबर शाखेच्या मदतीने तपासात घेतले. त्या पोस्टची लिंक शोधली असता ही अफवा पसरवणारी पोस्ट तराळे आणि ताकसांडे या दोघांनी व्हायरल केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी सदर पोलिसांनी तराळे आणि ताकसांडेला ताब्यात घेतले. त्यांना अफवा पसरविण्याच्या आरोपाखाली माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलमानुसार अटक करण्यात आली. या दोघांना सूचनापत्र देऊन सोडून देण्यात येणार असल्याचे सदर पोलीस ठाण्यातून कळले. पोलीस उपायुक्त विनिता शाहू यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे ठाणेदार महेश बनसोडे, सहायक निरीक्षक माने, सहायक निरीक्षक मोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

 

 

Web Title: Arrested for posting wrong Facebook post in the name of Nagpur Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.