रशियन, सायबेरियन, मंगाेलियन पक्ष्यांचे नागपुरात आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2021 10:57 AM2021-11-12T10:57:38+5:302021-11-12T11:06:45+5:30
नाेव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अंबाझरी उद्यान व तलाव परदेशी पक्ष्यांच्या थव्यांनी फुलले आहे. विविध प्रजातीच्या युराेपियन, रशियन, सायबेरियन व मंगाेलियन पक्ष्यांचे आगमन झाले असून, पक्षिप्रेमींसाठी ती पर्वणी ठरली आहे.
नागपूर : अंबाझरी तलावाला लागून असलेले जैवविविधता उद्यान मागील अनेक दशकापासून स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थळ ठरले आहे. नाेव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अंबाझरी उद्यान व तलाव परदेशी पक्ष्यांच्या थव्यांनी फुलले आहे. विविध प्रजातीच्या युराेपियन, रशियन, सायबेरियन व मंगाेलियन पक्ष्यांचे आगमन झाले असून, पक्षिप्रेमींसाठी ती पर्वणी ठरली आहे.
सध्या तलाव परिसरात रुडीशेल डक, नॉर्दन पिटेल, लिटिल ग्रेब्स, ट्रायकलर मुनिया आणि रेड ब्रेस्टेड फ्लायकॅचर आदी परदेशी पक्ष्यांनी मुक्काम ठाेकला आहे. त्यांना पाेहण्याचा राेमांच पक्षिप्रेमी अनुभवत आहेत.
पक्षितज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी नाेव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात युराेप, रशिया, सायबेरिया, मंगाेलियन पक्षी चीन व तिबेट मार्गे एव्हरेस्ट पर्वत पार करून भारतात प्रवेश करतात. यानंतर मध्य भारतासह दक्षिण भारताच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत पाेहचतात. मात्र यावर्षी ठराविक काळापूर्वीच ते भारतात पाेहचले असून, अंबाझरी तलाव परिसरात त्यांचा मुक्काम दिसत आहे. काही दिवसात इतरही परदेशी पक्ष्यांचे आगमन हाेण्याची शक्यता पक्षी अभ्यासकांनी व्यक्त केली.
याशिवाय देशाच्या विविध राज्यातून येणारे पर्पल हेरॉन, ग्रीन बी ईटर, ड्रोंगो, लिटिल कार्मोरेट, ग्रेटर कार्मोरेट, रेड क्रिस्टर्ड पोचार्ड, लेथर विसलिंग डकसारख्या आकर्षक पक्ष्यांचीही उपस्थिती तलाव परिसरात दिसून येत आहे. दरवर्षी १२ नाेव्हेंबर राेजी पक्षितज्ज्ञ सलीम अली यांचा जन्मदिवस साजरा केला जाताे. त्यांच्या जन्मदिनापूर्वीच गुरुवारी सलीम अली यांची चिमणी म्हणून ओळख असलेल्या येलाे थ्राेटेड स्पॅराेची जाेडी पक्षिप्रेमींना बघावयास मिळाली. पक्षी सप्ताहांतर्गत पक्षी अभ्यासक व मानद वन्यजीव रक्षक अविनाश लाेंढे, आरएफओ आशिष निनावे, राज्य वन्यजीव मंडळाचे सल्लागार कुंदन हाते, विनीत अराेरा, व्यंकटेश मुदलियार यांच्या मार्गदर्शनात ५५ पक्षिप्रेमींनी पक्षी निरीक्षण उपक्रमात सहभाग घेतला.
१५ दिवसापूर्वीच आगमन
पक्षी अभ्यासक अविनाश लाेंढे यांनी सांगितले, दरवर्षी हे परदेशी पक्षी नाेव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात नागपूरला पाेहचतात. मात्र सध्या चीनमध्ये अति बर्फवृष्टी सुरू असल्याने हे पक्षी तेथे थांबले नाही आणि त्यांनी थेट भारताकडे प्रयाण केले. यामुळे ठराविक काळाच्या १५ दिवसापूर्वीच अंबाझरी तलाव परिसरात या परदेशी पाहुण्यांचे आगमन झाले आहे.