आवक वाढली, भाज्या उतरल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2016 02:06 AM2016-08-01T02:06:54+5:302016-08-01T02:06:54+5:30
पावसामुळे भाज्यांची आवक दुप्पट आहे. बहुतांश भाज्यांच्या भावात घसरण झाली आहे.
भाव घसरल्याने शेतकरी हताश : पावसामुळे आवक वाढणार
नागपूर : पावसामुळे भाज्यांची आवक दुप्पट आहे. बहुतांश भाज्यांच्या भावात घसरण झाली आहे. भाव कमी झाल्यामुळे शेतकरी हताश असून पावसामुळे भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे. सणासुदीत गृहिणींना भाज्या किफायत भावात मिळतील. सध्या ग्राहक कमी आहे, पण किरकोळमध्ये भाज्या महागच आहेत. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आवक वाढेल, परिणामी भाव कमी होतील, अशी माहिती महात्मा फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतशी बोलताना दिली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी भाज्यांची लागवड केली आहे. आॅगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात भाज्या मोठ्या प्रमाणात बाजारात येतील.
सरकारच्या निर्णयाचा परिणाम
शेतकऱ्यांना भाजीपाला खुल्या बाजारात विकण्यास शासनाने परवानगी दिल्यानंतर विविध बाजारात शेतकरी भाज्यांची विक्री करीत आहे. मंगळवारी, सक्करदरा, वर्धा रोड, वाडी या भागात शेतकरी स्वत: भाज्या विकत आहेत. शेतकऱ्यांना भाव तर ग्राहकांना ताज्या भाज्या मिळत आहेत. कॉटन मार्केट चिल्लर आणि ठोक व्यवसायासाठी प्रचलित असल्यामुळे शेतकऱ्यांकडून आवक वाढली आहे. या बाजारात भाज्या विकण्यास शेतकऱ्यांना मनाई नाही.
फुलकोबी ६०, हिरवी मिरची १०० रु.
स्थानिक शेतकऱ्यांकडून फुलकोबीची आवक कमी झाल्यामुळे भाव वधारले आहेत. किरकोळमध्ये ६० रुपये किलो विक्री सुरू आहे. सध्या औरंगाबाद येथून आवक आहे. शेतकऱ्यांकडून फुलकोबी, पालक, चवळी भाजी, टमाटर आणि वांगे विक्रीस येत आहेत. वांगे आणि टमाटरचे भाव कमी झाले आहे. ठोक बाजारात १५ रुपये तर किरकोळमध्ये ३० रुपये भाव आहे. सध्या हिरवी मिरची पंजाबचा काही भाग आणि रायपूर व जगदलपूर येथून येत आहे. रविवारी ठोक बाजारात ६५ ते ७५ रुपये तर किरकोळमध्ये १०० रुपयांत विक्री झाल्याचे महाजन यांनी सांगितले.
ठोकमध्ये सांबार १० रुपये किलो!
पावसानंतर जूनच्या अखेरीस सांबारची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. छिंदवाडा,नांदेड, नाशिक येथून प्रचंड आवक आहे. तीन दिवसांपूर्वी १२ ते १३ ट्रक सांबार विक्रीविना पडून होता. सध्या संगमनेर, जयपूर (राजस्थान), मदनपल्ली (आंध्र प्रदेश) येथून टमाटर नागपुरात विक्रीसाठी येत आहेत. किरकोळमध्ये टमाटर ३० रुपये किलो आहेत. सिमला मिरची दुर्ग व भिलाई, भेंडी गोंदिया, कारले काटोल येथून, चवळी व गवार शेंगा नागपूर जिल्हा, पत्ताकोबी मुलताई या भागातून विक्रीस येत आहे.
कांदे स्वस्त, बटाटे महाग
मुबलक साठा आणि ग्राहकांकडून उठाव नसल्यामुळे कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. कळमन्यात दर्जानुसार भाव ५ ते ८ रुपये असून किरकोळमध्ये १५ रुपयांत विक्री सुरू आहे. गेल्यावर्षी कांदे महाग झाल्यानंतर सर्वच राज्यात मोठ्या प्रमाणात लागवड झाली. गुजरात, बिहार, बंगाल, ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेशात या राज्यांमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. यंदा कांद्याचे भाव वाढणार नाहीत. सध्या कळमन्यात अकोला, अमरावती येथून पांढरे तर बुलडाणा येथून लाल कांदे विक्रीस येत आहेत. आठवड्यात सरासरी २५ ट्रकची (प्रति ट्रक १० ते १२ टन) आवक आहे. शनिवारी ५० ट्रक आले. २५ ते ३० ट्रक विक्री झाली तर २० ट्रक कांदा बाजारात पडून होता. आंध्र प्रदेशातील कर्नुल जिल्ह्यात लाल कांदे निघाले आहेत. कळमन्यात एक महिन्यात विक्रीला येतील, अशी माहिती आलू-कांदे आडतिया असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी लोकमतला सांगितले.
बटाटे महागच
यंदा बटाट्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे तीन महिन्यापासून बटाटे महाग झाले आहेत. कळमन्यात आवक कमी आहे. दर्जानुसार १६ ते १८ रुपये किलो भाव असून किरकोळमध्ये ३० रुपये किलो भावात विक्री होत आहे. गेल्यावर्षी जास्त उत्पादनामुळे बटाट्याला भाव कमी मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड कमी केली. कानपूर, अलाहाबाद, आग्रा येथून आवक आहे. दररोज १० ते १२ ट्रक विक्रीस येत आहेत. बंगळुरू येथे बटाट्याचे पीक निघाले आहे. कळमन्यात येण्यास दीड महिना लागेल. काही भागात नवीन बटाटे दिवाळीनंतर बाजारात येतील, असे वसानी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)