दातांनी भेदतो लक्ष्यावर बाण
By admin | Published: February 27, 2016 03:30 AM2016-02-27T03:30:58+5:302016-02-27T03:30:58+5:30
गुरूविना शिक्षा घेऊन, केवळ आवाज ऐकून लक्ष्य भेदणारा एकलव्य सर्वांना परिचित आहे. कलियुगातही हे असंभव नाही.
भारताचा पहिला धनुर्धारी : जिगरबाज अभिषेकची अपंगत्वावर मात
नागपूर : गुरूविना शिक्षा घेऊन, केवळ आवाज ऐकून लक्ष्य भेदणारा एकलव्य सर्वांना परिचित आहे. कलियुगातही हे असंभव नाही. नागपुरातील अभिषेक ठवरे या अपंग युवकाने या दंतकथेला पुन्हा जिवंत केले आहे. अभिषेक भारताचा पहिला आर्चरी खेळाडू आहे, जो दाताने बाण ओढून लक्ष्याचा वेध घेतो.
आर्चरी हा खेळ हाताशिवाय शक्य नाही. धनुष्यावर बाण ताणून एका विशिष्ट्य ताकदीने तो टार्गेटला भेदावा लागतो. ताकदीबरोबरच एकाग्रताही या खेळात गरजेची आहे. परंतु अभिषेकचा उजवा हात पोलिओग्रस्त आहे. त्यामुळे तो डाव्या हाताने धनुष्य पकडून दातांच्या आधारे बाण ताणतो आणि तोही अचूक, अगदी सामान्य खेळाडूसारखा. नागपूर विद्यापीठांतर्गत झालेल्या आंतर विद्यापीठ आर्चरी स्पर्धेत सामान्य खेळाडूंमध्ये तो पहिला आला आहे.
बालपणात डॉक्टरांनी दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे त्याच्या उजव्या हाताला पोलिओने ग्रासले. आदर्श विद्यामंदिरातून सामान्य विद्यार्थ्यांमध्ये त्याने शिक्षण घेतले. राजेंद्र खंडाळ या क्रीडा शिक्षकाने त्याचे खेळाकडे आकर्षण वाढविले. सामान्यांबरोबरच तो अॅथिलॅटिक्समध्ये खेळू लागला. रनिंग, लाँग जम्प या खेळात त्याने सामान्याबरोबरच पॅराआॅलिम्पिकमध्ये घवघवीत यश संपादन केले. अशाच एका स्पर्धेत खेळता-खेळता त्याचा पाय जखमी झाला. डॉक्टरांनी त्याला खेळण्यास मनाई केली. त्यामुळे काहीसा अस्वस्थ झाला. दरम्यान तो संदीप गवई या अपंग आर्चरी खेळाडूच्या संपर्कात आला. त्याने दिलेल्या प्रोत्साहनामुळे अभिषेकने धनुष्य हाती घेतले. बुलडाण्याचे आर्चरी कोच चंद्रकांत इलग यांच्याकडून त्याने धनुर्विद्येचे प्रशिक्षण घेतले.
सुरुवातीला त्याला अतिशय कठीण गेले. दातांनी बाण ओढताना त्याची मान लागून जायची. डॉक्टरांचा सल्ला, व्यायाम आणि मेहनतीच्या बळावर त्याने दुखण्यावरही मात केली. एक उत्कृष्ट धनुर्धर म्हणून तो आज गणला जातो आहे. पटियाला येथे झालेल्या इंटर युनिव्हर्सिटी आर्चरी चॅम्पियनशीपमध्ये त्याची चांगली कामगिरी राहिली.
घरची परिस्थिती बेताची असल्याने अभिषेक जुन्या साहित्यानेच खेळावर कॉन्सट्रेट करतो आहे. हरियाणा येथे होणाऱ्या नॅशनल गेम्ससाठी तो तयारी करीत आहे. चांगला परफॉरमेंस देण्यासाठी त्याला नवीन धनुर्विद्या क्रीडा साहित्याची गरज आहे. त्यासाठी २.५० ते ३ लाख रुपये गोळा करायचे आहेत. त्याच्या आईने अभिषेकला खेळासाठी कधीही पैसे कमी पडू दिले नाही. त्याच्यासाठी स्वत:चे दागिने सुद्धा त्यांनी विकले आहेत.