आर्ट, कॉमर्सच्या विद्यार्थिनींनाही करता येईल नर्सिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:21 AM2020-12-04T04:21:57+5:302020-12-04T04:21:57+5:30
नागपूर : महाराष्ट्र नर्सिंग काैन्सिल व पॅरामेडिकल बोर्डाद्वारे मान्यताप्राप्त जीएनएम (जनरल नर्सिंग अॅण्ड मिडवायफरी) हा अभ्यासक्रम बंद करण्याचा प्रस्ताव ...
नागपूर : महाराष्ट्र नर्सिंग काैन्सिल व पॅरामेडिकल बोर्डाद्वारे मान्यताप्राप्त जीएनएम (जनरल नर्सिंग अॅण्ड मिडवायफरी) हा अभ्यासक्रम बंद करण्याचा प्रस्ताव इंडियन नर्सिंग काैन्सिलने केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे पाठविला होता. या प्रस्तावात जीएनएम बंद करून बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा असा उल्लेख होता. त्यामुळे आर्ट व कॉमर्स शाखेच्या विद्यार्थिनींना नर्सिंग क्षेत्रात येण्यास निर्बंध येणार होते. इंडियन नर्सिंग काैन्सिलच्या प्रस्तावाला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने नाकारले आहे. त्यामुळे आर्ट व कॉमर्सच्या विद्यार्थिनींनाही आता नर्सिंग करता येणार आहे.
महिला सशक्तीकरणाचे सर्वात मोठा माध्यम नर्सिंग क्षेत्र आहे. ग्रामीण भागातील मुलींना बारावीनंतर जीएनएम हा कोर्स केल्यानंतर सहजच १२ ते १५ हजार रुपयांची नोकरी उपलब्ध होते. आर्ट, कॉमर्सच्या विद्यार्थिनीही हा अभ्यासक्रम करून पायावर उभ्या होऊ शकतात. महाराष्ट्रात १७० जीएनएम अभ्यासक्रमाचे कॉलेज आहे. परंतु इंडियन नर्सिंग काैन्सिलने जीएनएम हा अभ्यासक्रम बंद करून बीएससी नर्सिंग हा अभ्यासक्रम देशभरात राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आर्ट, कॉमर्सच्या विद्यार्थिनींना नर्सिंग क्षेत्रात येण्यास निर्बंध येणार होते. इंडियन नर्सिंग काैन्सिलचे कार्यकारी सदस्य डॉ. विकास महात्मे यांनी सुद्धा जीएनएम कॉलेजवरील स्थगिती काही कालावधीसाठी काढावी यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्र्याला पत्र लिहिले होते. महाराष्ट्र नर्सिंग कॉलेज असोसिएशनने यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला. अखेर मंत्रालयाने काैन्सिलचा प्रस्ताव रद्द करून पूर्वीप्रमाणेच जीएनएम अभ्यासक्रम सुरू ठेवला. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना दिलासा मिळाला आहे.