कलाकाराला स्वत:चे ब्रॅंडिंग आवश्यक, अन्यथा कालबाह्य व्हाल
By आनंद डेकाटे | Published: June 3, 2024 03:11 PM2024-06-03T15:11:07+5:302024-06-03T15:11:57+5:30
Nagpur : 'एआयच्या युगात कलावंतांचे भविष्य'वर परिसंवाद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तंत्रज्ञानातील बदल कलाक्षेत्रावर परिणाम करत आहेत. एआयमुळे कलाक्षेत्रात नवीन संधी निर्माण होत आहेत. मात्र, त्याचवेळी काही आव्हानेही उभी राहत आहेत. भविष्यात कलाकाराने स्वतःचे ब्रॅंडिंग करणे फार आवश्यक आहे. अन्यथा कलाकार कालबाह्य झाल्या शिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन हर्षद सालपे यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ललित कला विभाग व छंद मंदिर आणि नारद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ललित कला विभागात 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) च्या युगात कला- कलावंतांचे भविष्य' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सालपे बोलत होते. विभाग प्रमुख डॉ. संयुक्ता थोरात या अध्यक्षस्थानी होत्या.
डॉ. संयुक्ता थोरात यांनी एआय आजच्या युगात कसे महत्त्वाचे आहे, याबाबत माहिती दिली. एआय कला व कलाकारांच्या फायद्याचेच आहे. केवळ त्याचा दुरूपयोग टाळून योग्य उपयोग करण्याचे शिक्षण आपण घेतले पाहीजे. संचालन विजय जथे यांनी केले. तर नारद फाउंडेशनचे उपाध्यक्ष पियूष धुमकेकर यांनी आभार मानले.