कलावंताने स्वत:ची ताकद ओळखावी
By admin | Published: February 21, 2016 03:03 AM2016-02-21T03:03:03+5:302016-02-21T03:03:03+5:30
आपल्याकडे ६४ कला आहेत. परंतु ललित कलेमध्ये केवळ पाचच कलांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
विनोद इंदूरकर : ‘दे नोवो समूह’ चित्र प्रदर्शनाला सुरुवात
नागपूर : आपल्याकडे ६४ कला आहेत. परंतु ललित कलेमध्ये केवळ पाचच कलांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. कारण सूक्ष्मदर्शनाचे जिथे दर्शन घडते ते ललित आहे. या कलेच्या प्रत्येक कलावंताची स्वत:ची एक ताकद असते. ती ओळखणे महत्त्वाचे असते. जेव्हा याची ओळख होते तेव्हा त्या कलावंताला कुणीच थांबवू शकत नाही, असे मत, टॅगोर फाईन आर्टचे प्राध्यापक डॉ. विनोद इंदूरकर यांनी येथे व्यक्त केले.
लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत आयोजित ‘दे नोवो समूह’ चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर ललित कला विभागाचे विभाग प्रमुख प्रा. मुक्तादेवी मोहिते, प्रसिद्ध चित्रकार विजय बिसवाल, प्रज्ञा भिसीकर उपस्थित होते.
प्रा. इंदूरकर म्हणाले, प्रत्येक चित्रातून काहीतरी अर्थ निघतो. रसिकांनी कुठलीही कला पाहताना सहृदय असले पाहिजे. तेव्हाच त्या कलेचा आनंद घेता येतो. ते म्हणाले, अनुभव म्हणजे कला नाही. परंतु एकाद्या वस्तूला स्वत:च्या ताकतीने आकार दिला जातो त्याला कला म्हणतात. कलावंतांच्या मनात संकोच नसावा. तो जर असेल तर आतील कला बाहेर येणार नाही. स्वत:हून शिका आणि त्याचा पाठपुरावा करा, हा मंत्रही त्यांनी यावेळी दिला. कलावंत हा समाजाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. समाजाला संदेश देण्याचे काम करते, असे मत मुक्ता मोहिते यांनी व्यक्त केले. विजय बिसवाल यांनी सर्व चित्रकारांना शुभेच्छा देत जिद्द व आशा कायम ठेवण्याचे आवाहन केले. संचालन जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीचे संयोजक अमित गोनाडे यांनी केले.
पेंटिंग, कोलाज, ग्राफिक, स्कल्पचर, डिजिटल आर्ट व फोटोग्राफी असे वैविध्यपूर्ण कलाविष्कार उलगडण्याचा प्रयत्न ‘दे नोवो समूह’ चित्र प्रदर्शनातून झाला आहे. या प्रदर्शनात अमित कुमार, अरविंद शर्मा, बिकाश स्नेहपती, दलबर सिंग, कुलदीप ग्रोव्हर, कुणाल सोनी, नरेश केओडक, राजू कुमार, राजू बैद, रामील रेधु, रणदीप सिंग, रुपेश भाटिया, समीर पॉल, संदीप कुमार, सशी कुमार, श्रीकांत, सुदीप वर्मा व विजेंद्र कुमार या १८ कलावंतांसह तीन आमंत्रित कलाकृतींचे प्रदर्शन करण्यात आले आहे. कला आणि समाज यांचा संबंध जोडण्यासाठी हा समूह कार्य करीत आहे. हे प्रदर्शन २३ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.(प्रतिनिधी)