रंग, रेषांच्या उत्कृष्ट फॉर्म्सचे कलात्मक प्रदर्शन
By admin | Published: May 29, 2016 03:01 AM2016-05-29T03:01:24+5:302016-05-29T03:01:24+5:30
एका बिंदूतून संपूर्ण डिझाईन आपल्यासमोर प्रगटते. या प्रकटीकरणाचे तंत्र आणि शैली सर्वच विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आत्मसात केली आहे,...
संध्या पांगारकर : जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीचे आयोजन
नागपूर : एका बिंदूतून संपूर्ण डिझाईन आपल्यासमोर प्रगटते. या प्रकटीकरणाचे तंत्र आणि शैली सर्वच विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आत्मसात केली आहे, हे प्रदर्शनातील चित्रातून जाणवते. या प्रकाराचे घटक आहेत ते रंग आणि रेषा. या घटकांवर सर्वांनीच घेतलेले परिश्रम त्यांच्या चित्रातून दिसत आहेत. प्रत्येक चित्रात असणारी कलात्मकता प्रेक्षकांना खेचण्यात नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास इंटेरिअर डिझाईनर संध्या पांगारकर यांनी शनिवारी व्यक्त केला.
स्थापत्यशास्त्रज्ञ श्रीकांत तनखीवाले आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचे ‘लॅण्डस्केप’ या प्रदर्शनाचे आयोजन जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी, लोकमत भवन, रामदासपेठ येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन संध्या पांगारकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी दर्डा आर्ट गॅलरीचे समन्वयक अमित गोनाडे, सुजाता तनखीवाले आणि श्रीकांत तनखीवाले प्रामुख्याने उपस्थित होते. हे पेंटिंग्ज आणि स्केचेसचे प्रदर्शन असून, यात रिअॅलिस्टीक आणि अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग्ज सादर करण्यात आले आहे. हे प्रदर्शन रसिकांसाठी ३० मेपर्यंत दुपारी ४ ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत खुले राहील. पांगारकर म्हणाल्या, निसर्ग मुळातच सुंदर असतो. हे सौंदर्य टिपण्याची आणि नेमकेपणाने आपल्या डिझाईनमध्ये आणण्यासाठी एक दृष्टी लागते. त्याशिवाय चित्रात कलात्मकता येत नाही. प्रदर्शनातील अनेक चित्रे रंगरेषांच्या माध्यमातून एक भाव घेऊन आले आहे. विशेषत: छाया-प्रकाशाचा खूप सुंदर उपयोग विद्यार्थ्यांनी केला आहे. श्रीकांत तनखीवाले म्हणाले, कला आणि व्यसन यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नसतो; पण काही लोक नव्या चित्रकारांना चुकीचे मत सांगतात. कलावंताला कुठले तरी व्यसन असते त्याशिवाय कलानिर्मिती होत नाही, हे मत सर्वथा चूक आहे. प्रत्येक कलावंताने त्याची सामाजिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आपण स्वत: कलावंत आहोत, पण कुठलेही व्यसन नाही. त्यामुळे स्वत:ला या क्षेत्रात घडविताना आपल्या सर्जनतेचा विचार करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. प्रदर्शनात जलरंग, अॅक्रॅलिक, स्केच आदी सर्व माध्यमात विद्यार्थ्यांनी कलाकृती तयार केल्या आहेत. विशेषत: प्रत्यक्ष एखाद्या स्थळी जाऊन वेगवेगळ्या कोनातून विद्यार्थ्यांनी साकारलेले ‘लॅण्डस्केप’ ही या प्रदर्शनाची जमेची बाजू आहे. प्रदर्शनात जवळपास १०० विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलाकृती प्रदर्शित केल्या आहेत. (प्रतिनिधी)
दर्डा आर्ट गॅलरी ही कलावंतांसाठी उपलब्धी
आम्हा कलावंतांना दर्डा आर्ट गॅलरीसारखी प्रतिष्ठा असलेली गॅलरी उपलब्ध झाली याचा मनापासून आनंद वाटतो. या गॅलरीत झालेले प्रत्येक प्रदर्शन यशस्वी झाले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात गॅलरी असल्याने रसिकांना सहजपणे गॅलरीला भेट देता येते आणि कलावंतांच्या कलाकृती मोठ्या प्रमाणात रसिकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळेच दर्डा आर्ट गॅलरीत कलाकृती प्रदर्शित करण्याचे समाधान आहे.
- श्रीकांत तनखीवाले