कलावंतांनी आपला कार्यक्रम समजून संमेलनात यावे : प्रसाद कांबळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:45 AM2019-02-22T00:45:57+5:302019-02-22T00:47:25+5:30

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे मोठ्या थाटामाटात नाट्य संमेलनाचे आयोजन केले जाते, मात्र रंगकर्मी किंवा चित्रपट कलावंत त्याकडे पाठ फिरवितात, अशी टीका केली जाते. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांना ही टीका मान्य नसली तरी कलावंतांनी आपल्या घरचा कार्यक्रम समजून नाट्य संमेलनात यायला पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ९९ व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला पूर्वरंगच्या कार्यक्रमात सहभागी कांबळी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Artists should come to the sammelan to understand their event: Prasad Kambli | कलावंतांनी आपला कार्यक्रम समजून संमेलनात यावे : प्रसाद कांबळी

कलावंतांनी आपला कार्यक्रम समजून संमेलनात यावे : प्रसाद कांबळी

Next
ठळक मुद्देकलावंतांच्या मदतीसाठी योजना आखणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे मोठ्या थाटामाटात नाट्य संमेलनाचे आयोजन केले जाते, मात्र रंगकर्मी किंवा चित्रपट कलावंत त्याकडे पाठ फिरवितात, अशी टीका केली जाते. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांना ही टीका मान्य नसली तरी कलावंतांनी आपल्या घरचा कार्यक्रम समजून नाट्य संमेलनात यायला पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ९९ व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला पूर्वरंगच्या कार्यक्रमात सहभागी कांबळी यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नाटक, चित्रपट, मालिका अशा सर्वच कलावंतांना नाट्य संमेलनाची उत्सुकता असते आणि बहुतेक कलावंत सहभागी होतातही. मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे किंवा शुटींगमुळे ते संमेलनात सहभागी होऊ शकत नाही. जवळच्या परिसरात संमेलन असेल तर शुटींग संपवून मध्यरात्रीही संमेलनात सहभागी होताना अनेक कलावंतांना पाहिल्याचे त्यांनी सांगितले. कदाचित संमेलनाच्या तारखा ऐनवेळी ठरत असल्याने त्यांना येणे शक्य होत नाही. त्यामुळे पुढच्या वेळेपासून किमान संमेलनाच्या तारखातरी वर्षभर आधी निश्चित करण्याचा प्रयत्न आम्ही करू, अशी भूमिका त्यांनी मांडली. तरीही कलावंत सहभागी झाले नाही तर मात्र त्यांच्यावर टीका करणे योग्य ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या वयोवृद्ध कलावंतांच्या मदतीबाबत मात्र त्यांनी असमर्थता दर्शविली. नाट्य परिषदेकडे भक्कम आर्थिक निधी नाही व परिषदेचे बहुतेक उपक्रम हे सरकारच्या निधीवर सुरू असतात. राज्यभरात अशा गरजू कलावंतांची संख्या कमी नाही. मात्र नाट्य परिषद एवढी सक्षम नाही की त्यांना मदत करू शकेल. त्यामुळे परिषदेकडे कलावंतांच्या मदतीसाठी ठोस असा निधी उभा राहील यासाठी काही उपक्रम व योजना आखणे आवश्यक असल्याची भावना कांबळी यांनी व्यक्त केली. आतापर्यंत झालेल्या नाट्य संमेलनांचे डाक्युमेंटेशन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्राच्या एकूणच रंगभूमीच्या प्रथा, परंपरा, लकबी व कलावंतांची संवादफेक इथपासून या डाक्युमेंटेशनचे काम करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आठ महिन्याच्या कालावधीत दोन संमेलने आयोजित करण्यात आली आहेत. मात्र या संमेलनात नवीन काही देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. केवळ हौशी आणि व्यावसायिकच नाही तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागाची सांस्कृतिक ओळख असलेल्या कलांनाही स्थान देण्यात येत आहे.
वैदर्भीय झाडीपट्टी व दंडारप्रमाणे सर्व कलांना व कलावंतांना त्यांची कला सादरीकरण करायला मिळेल, हा उद्देश आहे. नागपूरचे संमेलनही यानुसार वेगळे आणि अलौकिक ठरेल, असा विश्वास प्रसाद कांबळी यांनी व्यक्त केला.
संगीत नाटकांना मरण नाही : कीर्ती शिलेदार
अ.भा. मराठी नाट्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी संगीत नाटकांच्या अस्तित्वाबाबत विश्वास व्यक्त केला. मूळत: संगीत नाटकात अभिनय साकारून लोकप्रिय झालेल्या शिलेदार यांनी जोपर्यंत रंगभूमी जिवंत आहे तोपर्यंत संगीत नाटकांना मरण नाही, असा ठाम विश्वास व्यक्त केला. बालरंगभूमी, हौशी आणि व्यावसायिक रंगभूमी अशा सर्व प्रकारांचे महाराष्ट्रात चांगले प्रयोग आणि उपक्रम सुरू आहेत. त्या स्वत:ही अभिनयाच्या व संगीत नाटकांच्या कार्यशाळा घेत आहेत. मात्र पूर्वीप्रमाणे दोन-तीन तास बसून संगीत नाटक बघणारा प्रेक्षक राहिला नाही. लोकांना नाटक आवडते, बघायची इच्छाही असते, मात्र तेवढा वेळ देण्याची तयारी आणि शक्यताही नसते. लोकांना संगीत नाटकातील नाट्यपदे आवडतात व वेगवेगळ्या कार्यक्रमातून त्यांना ती ऐकायला मिळतात. सोशल मीडिया हे रंगभूमीसाठी आव्हान आहे, असे त्यांना वाटत नाही. उलट हे नवे माध्यम कलावंतांना मिळाले आहे जे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचते आहे. मात्र कलावंतांना ते योग्यपणे हाताळता आले पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. नागपूरचा प्रेक्षक हा चोखंदळ आहे. त्यांना सकस काही हवे असते, अशी भावना त्यांना व्यक्त केली.

 

Web Title: Artists should come to the sammelan to understand their event: Prasad Kambli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.